मेट्रोच्या कामामुळे झोपेचं खोबरं, दक्षिण मुंबईतील रहिवाशांचा हायकोर्टात दावा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

स्थानिकांचा विरोध जुगारून मेट्रो प्रशासनाने दक्षिण मुंबईत काम रेटण्याचे सुरूच ठेवले आहे. ध्वनिप्रदूषणामुळे उच्च न्यायालयाने मेट्रोच्या नाइट शिफ्ट कामावर बंदी घातली असली तरीही ‘एमएमआरडीए’कडून मात्र रात्रीच्या वेळेस काम करण्यात येत आहे. या कामामुळे शरीराला आवश्यक असलेली निवांत झोप मिळणे कठीण झाले असून गेल्या सहा महिन्यांपासून झोपेचे खोबरे झाले आहे. त्यामुळे मुलांच्या शारीरिक तसेच मानसिकतेवर त्याचा परिणाम होत असल्याचा दावा स्थानिक रहिवाशांनी हायकोर्टात आज केला. तसेच मेट्रोच्या नाइट शिफ्ट कामावर बंदी कायम ठेवावी अशी आर्जवही खंडपीठाकडे केली.

ध्वनिप्रदूषणाच्या मुद्द्यावरून हायकोर्टाने डिसेंबर 2017 पासून मेट्रोच्या नाइट शिफ्ट कामावर बंदी घातली आहे. याचा फटका मेट्रो प्रशासनाला बसला असून कामाची डेडलाइन हुकण्याची शक्यता आहे. हे टाळण्यासाठी दक्षिण मुंबईत मेट्रोचे काम रात्रभर सुरू ठेवण्याची परवानगी द्यावी अशी मागणी मेट्रो प्रशासनाने हायकोर्टाकडे केली आहे. याला दक्षिण मुंबईतील स्थानिक नागरिक रॉबिन जयसिंघानी यांनी आक्षेप घेतला आहे. प्रभारी मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी घेण्यात आली. रात्रीच्या वेळेस ट्रकद्वारे वाहतूक होणार असल्याने त्याचा मोठ्या प्रमाणात आवाज होणार असल्याची माहिती याचिकाकर्त्यांनी हायकोर्टात आज दिली. या कामामुळेच पुरेशी झोप मिळत नसल्याचे याचिकाकर्त्यांनी हायकोर्टाच्या निदर्शनास आणून दिले. मेट्रोची बाजू मांडणारे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनीही त्यास दुजोरा देऊन आवाज नियंत्रित राहावा म्हणून त्या ठिकाणी नॉईस बॅरीअर व योग्य ती काळजी प्रशासनाने घेतली असल्याचा युक्तिवाद केला. हायकोर्टाने दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून घेऊन याबाबतचा आदेश राखून ठेवला.

कामाला उशीर होत असल्याने खर्च वाढतोय!
टनेल बोअरिंग मशीनद्वारे भूमिगत बोगदा खोदण्यात येणार असून एकदा काम सुरू झाले तर ते थांबविता येणार नाही. शिवाय उशीर होत असल्यामुळे प्रकल्पाचा खर्चही वाढत आहे. त्यामुळे चोवीस तास कामाची परवानगी देण्यात यावी अशी मागणी सरकार तसेच मेट्रोच्या वतीने आज करण्यात आली.

summery- sobo citizens PIL against night time metro work