सामाजिक जाणिवेतून कोल्हापूरमध्ये मदत व स्वच्छता संवर्धन मोहीम

363

शनिवारी आणि रविवारी सूर्यवंशी क्षत्रिय युवक मंडळ, पालघर तालुका आणि युवाशक्ती प्रतिष्ठान,पालघर यांच्या संयुक्त विद्यमाने कोल्हापूरमधील शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्त गावांमध्ये कुटूंब उपयोगी साहित्य वाटप आणि स्वच्छता संवर्धन मोहीम आयोजित करण्यात आली होती. सूर्यवंशी क्षत्रिय युवक मंडळ आणि युवाशक्ती प्रतिष्ठानच्या सदस्यांनी शिरटी, हासुर व घालवड गावातील जवळपास 125 कुटुंबाना जीवनावश्यक वस्तू आणि साहित्याचे वाटप केले. युवाशक्ती प्रतिष्ठान पालघर अंतर्गत रविवारी सकाळी 9  ते दुपारी 2 या वेळेत पूरपरिस्थिती मध्ये संपूर्णतः बुडालेले घालवड गावातील प्राथमिक आरोग्य केंद्राची स्वच्छता करण्यात आली. स्वच्छता मोहीमेत सहभागी झालेल्या एकूण 30 प्रतिनिधींनी आरोग्य केंद्राच्या 4 खोल्यांची, मधले 4 पॅसेज, कपाटामधील खराब औषध, भिजलेले पेपरचे गठ्ठे, मशिनरी, बिछाने, ब्लँकेट व गाळ साफ करून स्वच्छता केली, यामुळे परिसरातील लोकांना ओपिडी सेवेचा फायदा होणार आहे.

युवा शक्ती प्रतिष्ठानच्या सहभागी प्रतिनिधींनी सरसेनापती धनाजीराव जाधव यांच्या समाधी स्थळास भेट देऊन मानवंदना अर्पण केली. युवा शक्ती प्रतिष्ठान पालघर अंतर्गत सामाजिक उपक्रम, ग्रामीण तरुण जागृती, दुर्गसंवर्धन सहभाग, इतिहास सफर सहभाग इत्यादी उपक्रमांनी सातत्याने सामाजिक सेवा भान जपण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. “सातत्याने सामाजिक भान, जाणीव जपणारे उपक्रम व त्यातील तरुण प्रतिनिधींचा सहभाग ही विशेष भाग असून आगामी उपक्रमात जिल्ह्यातील ग्रामीण भागावर विशेष लक्ष देण्यात येईल”’’ असे मत युवा शक्ती प्रतिष्ठानचे प्रमुख प्रशांत सातवी यांनी व्यक्त केले.

आपली प्रतिक्रिया द्या