ऐकावे ते नवलच; कचऱयाची पिशवी ‘लाख’ मोलाची!

सोशल मीडियावर सध्या एका प्रसिद्ध ब्रॅंडने लाँच केलेल्या कचऱयाच्या पिशवीची जोरदार चर्चा आहे. आता कचऱयाची पिशवी हा काय चर्चेचा विषय असू शकतो का, असा प्रश्न सहाजिकच तुम्हाला पडला असेल. पण, ही काही साधीसुधी पिशवी नाही बरं का…. ‘बलेनसिएज’ या जगप्रसिद्ध ब्रॅंडने तयार केलेल्या या कचऱयाच्या पिशवीची किंमत 1 लाख 40 हजार रुपये इतकी आहे. कंपनीच्या मते, या पिशवीत अनेक खास गोष्टी दडल्या आहेत. ही पिशवी बनवण्यासाठी प्लॅस्टिकऐवजी चामडय़ाचा वापर करण्यात आला आहे. मात्र, किंमत ऐकूनच नेटिझन्स चक्रावले असून अनेकांनी त्यावर मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एवढय़ा महागडय़ा पिशवीत नेमका कुठल्या प्रकारचा कचरा टाकायचा, असा सवाल काहींनी उपस्थित केला आहे. बलेनसिएज ही पंपनी अत्यंत सर्वसामान्य दिसणाऱया वस्तू महागात विकण्यासाठी प्रसिद्ध आहे. गतवर्षी कंपनीने एक रंग गेलेले स्वेटर तब्बल 1 लाख 18 हजार 360 रुपयांत लाँच केले होते.