
सराईत चोरटय़ाला पोलिसांनी अटक केली असून, त्याच्या ताब्यातून 15 दुचाकी, 10 मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. या सराईताकडून सोलापूर व पुण्यातील 14 गुन्हे उघडकीस आले आहेत.
अविनाश गोपाळ आसबे असे अटक केलेल्या सराईत आरोपीचे नाव आहे. सोलापूर शहर व परिसरात मोटारसायकल चोरीच्या घटना वाढलेल्या असून, पोलीस तपास सुरू असताना नवी पेठ येथे संशयावरून अविनाश गोपाळ आसबे (रा. मु.पो. दहिटणे लक्ष्मीनगर) याला पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली असता त्याच्याजवळ चोरीच्या 15 दुचाकी, 10 मोबाईल आढळले.
या सराईताकडून फौजदार चावडी, विजापूर नाका, सदर बझार, जोडभावी पोलीस ठाणे, हडपसर व समर्थ पोलीस ठाणे पुणे, अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणे, मोहोळ व सोलापूर ग्रामीण पोलीस ठाण्यातील 14 गुन्हे उघडकीस आले असून, सुमारे सहा लाख तीन हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. फौजदार चावडी पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक शंकर धायगुडे, पोलीस हवालदार दीपक डोके, चौगुले, पोलीस नाईक बाबर, बागलकोटे, पोलीस कॉन्स्टेबल गायकवाड, बडुरे, व्हटकर, मोरे, लवटे, चव्हाण, चानकोटी, गुळवे यांनी सदरची कामगिरी केली आहे.



























































