25 कोटींच्या रस्त्यांची कामे पावसाळ्यानंतरच, सोलापूर मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांची माहिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महापालिकेच्या चालू अंदाजपत्रकात तरतूद करण्यात आलेल्या 25 कोटी रुपये खर्चाच्या रस्त्यांच्या कामांना आता पावसाळ्यानंतरच सुरुवात होऊ शकेल, अशी माहिती मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिली आहे. 25 कोटींतून सोलापूर शहराच्या वेगवेगळ्या भागातील 17 मुख्य रस्ते दुरुस्त केले जाणार आहेत. त्यासाठी पाच ठेकेदारांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना लवकरच वर्क ऑर्डर देण्यात येईल. सुरुवातीला या रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजवण्याचे काम तातडीने हाती घेण्यात येईल, असेही आयुक्तांनी सांगितले.

गेल्या पंधरवडय़ात पावसामुळे सोलापूर शहरातील रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. या खड्डय़ांचा सर्व्हे करण्याचे आदेश विभागीय अधिकाऱयांना देण्यात आले आहेत. त्याचा अहवाल प्राप्त होईल. पाऊस थांबताच हे खड्डे बुजवण्याचे काम हाती घेण्यात येईल, असेही शिवशंकर यांनी सांगितले.

सोलापूर शहरातून राष्ट्रीय महामार्ग तसेच राज्य महामार्ग जातात. या महामार्गावरदेखील खड्डे पडले आहेत. सात रस्ता ते संभाजी तलाव हा रस्ता अत्यंत खराब आणि धोकादायक बनला आहे. रस्ता दुरुस्त करून दिल्यास महापालिका ताब्यात घेईल. याबाबत राज्य महामार्ग आणि राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱयांना महापालिकेने पत्र देऊन कळवले आहे. चार हुतात्मा चौकातील खाद्यपदार्थ विक्रेत्यांना जागा रिकामी करण्यासाठी 28 जुलै ही अखेरची मुदत दिली आहे. याबाबतची नोटीसदेखील संबंधितांना यापूर्वीच देण्यात आली आहे.

13 ते 15 ऑगस्ट दरम्यान ‘हर घर तिरंगा’ हा उपक्रम राबवला जाणार आहे. यासाठी जवळपास दोन लाख तिरंगा ध्वज लागणार आहेत. शासनाकडून काही ध्वज मिळतील, तर सोलापूर शहरातील उद्योजक, व्यापारी आणि कारखानदार यांनीही मदत करण्याची तयारी दर्शवली आहे. महापालिका आवारात शंभर फूट उंचीचा तिरंगा ध्वज लावण्यात येईल. इंद्रभवन आणि कौन्सिल हॉल या दोन्ही इमारतींच्या मधल्या जागेत हिरवळीवर हा ध्वज उभारला जाईल. सोलापूर शहरात प्रथमच इतक्या उंचीचा ध्वज उभारण्यात येणार आहे, असेही आयुक्त पी. शिवशंकर यांनी सांगितले.

महापालिका निवडणुकीसाठी शुक्रवारी ओबीसी आरक्षण सोडत

29 जुलै रोजी सोलापूर महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ओबीसी आरक्षण काढण्यात येणार आहे. नियोजन भवन येथे सोडत काढण्याची व्यवस्था करण्यात येईल. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती वगळता अन्य जागांमधून महिलांचे आरक्षण काढण्यात येणार आहे. याबाबतचे मार्गदर्शन राज्य निवडणूक आयोगाकडून प्राप्त होईल, अशी माहिती आयुक्तांनी दिली.