
सोलापूर आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी भूसंपादनाचा मार्ग मोकळा झाला असून, उद्या जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक होणार आहे. या जागेसाठी शासनाने 42 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.
सोलापुरातील आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी बोरामणी येथे यापूर्वीच जमीन संपादित करण्यात आली आहे. परंतु या विमानतळासाठी लागणारी 29 हेक्टर जमीन ही वन विभागाची असून, यासंबंधी काही अडचणी निर्माण झाल्या होत्या. या जमिनीबाबत नागपूर येथील अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक व केंद्र अधिकारी संजीव गौड यांच्याबरोबर नुकतीच बैठक झाली. या बैठकीत वनजमीन आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यासंबंधी सकारात्मक चर्चा झाली.
या भूसंपादनासाठीचा प्रस्ताव महाराष्ट्र शासनाकडून विमानतळ प्राधिकरणाला प्राप्त होताच कामाला गती येणार आहे. महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाचे सोलापूरचे व्यवस्थापक सज्जन निचळ यांनी या प्रस्तावाचा पाठपुरावा करीत असून, सोमवारी भूसंपादनाबाबत जिल्हाधिकारी मिलिंद शंभकर यांच्याबरोबर बैठक होणार आहे.
29 हेक्टरमुळे रखडले होते काम
आंतरराष्ट्रीय दर्जाच्या या विमानतळाला 550 हेक्टर जमीन संपादित करण्यात आली असून, अवघ्या 29 हेक्टरवरील जमिनीचे प्रकरण प्रलंबित होते. वन विभागाची जमीन संपादित केल्यानंतर जमिनीवर वन विभागाच्या मदतीने वृक्षलागवड व गवत कुरणे विकसित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. याचा संपूर्ण खर्च महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरण, मुंबई करणार आहे. सोलापुरात सध्या विमानतळाचा मुद्दा ऐरणीवर आला असून, काही संघटना वारंवार आंदोलने करीत आहेत. या जमीन संपादनाचा मार्ग मोकळा झाल्याने आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारणीच्या कामाला वेग येणार आहे.




























































