
सोलापूर शहर व परिसरातील पाच वैद्यकीय व्यावसायिक, बांधकाम व्यावसायिक व एका उद्योजकावर आज आयकर विभागाने धाड टाकून तपासणी केली. तब्बल 12 तासांहून अधिक काळ ही कारवाई सुरू होती. शहरातील नामवंत हॉस्पिटल व डॉक्टरांविरुद्ध कारवाई सुरू असल्याने शहरात खळबळ उडाली असून, चर्चेला उधाण आले आहे.
अश्विनी हॉस्पिटल सोलापूर, अश्विनी हॉस्पिटल व वैद्यकीय महाविद्यालय कुंभारी, सात रस्ता परिसरातील डॉ. गुरुनाथ वरळे यांचे स्पंदन हार्ट केअर हॉस्पिटल, डॉ. अनुप शहा यांचे हार्ट क्लिनिक, विजयकुमार रघोजी यांचे रघोजी किडनी आणि मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, मेहुल कन्स्ट्रक्शन व बिपीनभाई पटेल यांच्या निवासस्थानी आयकर विभागाने दिवसभर तपासणी केली.
उद्योजक व बांधकाम व्यावसायिक बिपीनभाई पटेल यांच्याशी अश्विनी हॉस्पिटल-वैद्यकीय महाविद्यालय, मेहुल कन्स्ट्रक्शन संबंधित आहेत. पटेल चेअरमन व संचालक असून, त्यांच्या चौकशीविषयी चर्चेला उधाण आले आहे. अश्विनी रुग्णालय हे पूर्वी लोकमंगल इंटरनॅशनल हॉस्पिटल म्हणून परिचित होते. त्याचे प्रवर्तक भाजपचे आमदार सुभाष देशमुख होते. त्यानंतर हे हॉस्पिटल पटेल यांच्या पटेल ट्रस्टने घेतले आहे. त्यामुळे पटेल यांच्या हॉस्पिटल, कन्स्ट्रक्शन कंपनी व घरावर पडलेले छापे सध्या चर्चेचा विषय आहे.



























































