३ हजारांऐवजी २००च कीट का आणले? राजकारण नको मदत करा! चमकोगिरी करणाऱ्या मिंधेंच्या प्रवक्त्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी फटकारले

solapur-collector-slams-party-spokesperson-over-flood-aid-drama

राज्यात पूरपरिस्थिती असताना मिंध्यांच्या नेते, प्रवक्ते चमकोगिरी करत आहेत. काही ठिकाणी ग्रामस्थांनीच मिंधेंचे फोटो असणारी मदत नाकारली, तर काही ठिकाणी नेत्यांना घेराव घातले असे पाहायला मिळाले. त्यातच सोलापूरमधील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. राजकीय वर्तुळात ‘वाचाळवीर’ म्हणून ख्याती असलेल्या मिंधे गटातील सोलापूरच्या महिला प्रवक्त्याची गावकऱ्यांसमोर चांगलीच फजिती झाली.

सीना नदीला आलेल्या पूरग्रस्त गावांची पाहणी आणि मदत करण्यासाठी मिंध्यांच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे या आपल्या काही कार्यकर्त्यांना घेऊन उत्तर सोलापूर मधील पाकणी या गावात गेल्या होत्या. यावेळी गावातील हजाराहून अधिक लोकांनी हजेरी लावली. काहीतरी भरीव मदत मिळेल अशी अपेक्षा होती मात्र केवळ दोनशे पिशव्यामधून आणलेले धान्य पूरग्रस्तांना वाटप करण्यात आले. सुमारे तीन हजार लोकांपैकी दोनशे लोकांना मदत केल्याने उर्वरित गावकऱ्यांनी वाघमारेंना फैलावर घेतले. त्यामुळे मदतीची नौटंकी प्रवक्त्यांच्या अंगलट आली. आता या गावकऱ्यांच्या रोषातून सुटका कशी करून घ्यायची गावातून पळ कसा काढायचा या चिंतेत असलेल्या वाघमारेंनी स्वतःची सुटका करून घेण्यासाठी सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना फोन लावला. मिंध्यांच्या कार्यपद्धतीनुसार फोन स्पीकरवर ठेवला आणि ठसक्यात बोलणे सुरू केलं.

‘साहेब…पाकणीला मदत मिळाली नाही अपुरी मदत मिळाली वगैरे गाऱ्हाणे सुरू केलं. जिल्हाधिकाऱ्यांनी सत्ताधारी पक्षाच्या लोकनेत्या म्हणून विनम्रपणे ऐकून घेतलं लवकरच मदत पोहचेल असे आश्वासन देखील दिलं. जिल्हाधिकाऱ्यांची मवाळ भूमिका पाहून बाईंनी आवाज वाढविला अन् साहेबांना दमात घ्यायला लागल्या. शेकडो गावकरी समोर उभे राहून ऐकत होते. मोबाईल स्पीकरवर. तीन हजार लोकसंख्येचे गाव आणि चारशे पाचशे लोकांना शासनाच्या जेवणाचे किट मिळाले आहे असा तक्रारीचा सूर बाईंना लावला. त्यावर जिल्हाधिकारी म्हणाले, सर्वांना जेवण पोहच करणे शक्य नाही म्हणून जीवनावश्यक वस्तूंचे किट आम्ही प्रत्येक घरी वाटप करीत आहोत. वाटप सुरू आहे ज्यांना मिळाले नसेल त्यांना लवकरच देण्याची व्यवस्था केली असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी खुलासा केला. जिल्हाधिकाऱ्यांच्या वक्तव्यानंतर वाघमारे म्हणाल्या तीन हजार लोक आणि तुमचे वाटप किट यामध्ये तफावत आहे असे कसे चालेल… त्यांच्या या वक्तव्याने जिल्हाधिकाऱ्यांनी बाईंना फैलावर घेतले. तुम्ही गावात मदत करायला गेला आहात किती किट नेले. दोनशे… गावातील लोक तीन हजार सर्वांना मदत करा… ही वेळ राजकारण करण्याची नाही… तुम्ही तुमच्या पक्षाच्या वतीने मदत करा असे खडे बोल सुनावत अधिकाऱ्यांनी प्रवक्त्यांची बोलती बंद केली… काय बोलावे आणि काय नाही अशी विचित्र अवस्था प्रवक्त्यांची झाली… चेहऱ्यावर खोटे हास्य आणत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न प्रवक्त्याने केला आणि पुढे संभाषण गुंडाळून मोबाईल बंद केला.

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद हे नैसर्गिक आपत्ती ओढवल्या पासून चोवीस तास लोकांच्या मदतीसाठी तत्पर आहेत. जिल्ह्याची संपूर्ण यंत्रणा कार्यान्वित करून लोकांना दिलासा देण्यासाठी रात्रंदिवस काम करत असताना अशा कर्तव्य कठोर अधिकाऱ्याला मोबाईलवर दमबाजी करणाऱ्या प्रवक्त्यां विषयी लोक प्रचंड संताप व्यक्त करत आहेत.