सोलापूरच्या सीमेवर शेतीच्या वादातून हत्याकांड; सहाजणांना भररस्त्यात गोळ्या घातल्या, गळे चिरले, हात छाटले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सोलापूरच्या सीमेवर असलेल्या कर्नाटक हद्दीतील गोविंदपूर गावात भररस्त्यात सहाजणांना गोळ्या घालून गळे चिरले व हात छाटले. या घटनेने गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. शेतीच्या वादातून शुक्रवारी झालेल्या या हत्याकांडाने विजयपूर व सोलापूर हादरले आहे.

रेवणसिद्धप्पा निराळे, दुंडप्पा रेवणसिद्धप्पा निराळे, शिवपुत्र रेवणसिद्धप्पा निराळे, चंद्रशेखर निराळे, शब्बीर अत्तार यांच्यासह आणखी एकाची हत्या करण्यात आली आहे. सोलापूरच्या सीमेवर असलेल्या गोविंदपूर गावातील (ता. चडचण, जि. विजयपूर, कर्नाटक) निराळे कुटुंब आणि गुळगी (गोलगी) या दोन कुटुंबांत अनेक दिवसांपासून शेतजमिनीच्या खरेदीवरून संघर्ष सुरू होता.

शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास अज्ञात हल्लेखोर गावात आले आणि त्यांनी भररस्त्यात निराळे कुटुंबीय व त्यांचा एक सहकारी अशा सहाजणांवर गोळीबार करत हल्ला केला. त्यानंतर हल्लेखोरांनी निराळे कुटुंबातील काही जणांवर कोयत्याने वार करत गळे चिरले, हात छाटले. यात रेवणसिद्धप्पा निराळे, दुंडप्पा निराळे, शिवपुत्र निराळे, चंद्रशेखर निराळे व त्यांचा सहकारी शब्बीर अत्तार आणि निराळे कुटुंबातील आणखी सदस्य यांचा जागीच मृत्यू झाला. या सहाजणांचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते. या हत्याकांडानंतर हल्लेखोर फरार झाले.

घटनेची माहिती मिळताच, गावात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला असून, गावकऱ्यांत भीतीचे वातावरण पसरले आहे. या हत्याकांडात एकाच कुटुंबातील पाचजणांना जीव गमवावा लागला आहे. शेतीचा वाद व पूर्ववैमनस्यातून हे हत्याकांड झाल्याची चर्चा आहे. चडचण पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली असून, वरिष्ठ पोलीस अधिकारी गावात तळ ठोकून आहेत.