अफरातफरप्रकरणी सोलापूर जिल्ह्यातील 54 ग्रामपंचायतींना दंड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सोलापूर जिल्ह्यातील 54 ग्रामपंचायतींना अफरातफरप्रकरणी सुमारे साडेतेरा लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. विभागीय आयुक्ताकडून ही दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

याबाबत माहिती अशी की, सोलापूर जिह्यातील 54 ग्रामपंचायतींनी स्थानिक लेखापरीक्षण विहित कालावधीत केले नव्हते. विभागीय आयुक्तांच्या चौकशीत ही घटना उघडकीस आल्याने चौकशीअंती विभागीय आयुक्तांनी प्रत्येक ग्रामपंचायतीस 25 हजार रुपये दंड ठोठावला आहे. यात माढा, मोहोळ, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर या तालुक्यांतील गावांचा समावेश आहे.

वेळेत दंड भरला नाही तर कारवाई झालेल्या या ग्रामपंचायतींना केंद्र शासनाकडून मिळणाऱया अनुदानात कपात करण्यात येणार आहे. ग्रामपंचायत विभागाकडे 561 अफरातफरीची प्रकरणे दाखल करण्यात आली होती. या प्रकरणात सुमारे 1 कोटी 11 लाख 53 हजार 512 रुपयांच्या वसुलीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यापूर्वी जिल्हा परिषदेने 880 प्रकरणांत सुमारे एक कोटी रुपयांची वसुली केली आहे.

दरम्यान, ग्रामपंचायत स्तरावरील प्रामाणिक, रोजकीर्द, हजेरीपत्रक, मूल्यांकन, दाखले, वसुलीच्या पावत्या उपलब्ध नसल्याची माहिती पुढे येत आहे. सदरची दंडवसुलीची जबाबदारी ग्रामसेवकांवर निश्चित करण्यात आली आहे.

चपळगाववाडी, भोगाव, पिंपळगाव धस, पिंपळगाव पान, उपळाई, टाकळी, टेंभुर्णी, शिरापूर, मोहोळ, हातीज, पाडळी, मांगी, धोत्री, टेंभुर्णी, वरवंडे, सांगवी, चुंगी, लव्हे, बोरगाव, वाघोली, चळे, राममसले, कासेगाव आदी गावांचा दंडात्मक कारवाईत समावेश आहे.