रुग्णांची माहिती लपविणाऱया डॉक्टरवर गुन्हा दाखल करणार

सोलापूर शहरात मागील दिवसापासून पाच हजार 155 रुग्ण वाढले असून, त्यांतील 165 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मृत्यूदर वाढण्याच्या कारणांचा शोध आता खुद्द महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनीच घ्यायला सुरुवात केली आहे. एखाद्या खासगी डॉक्टरांनी त्या रुग्णाची माहिती लपवून, लक्षणे असतानाही कोरोना टेस्ट न करताच त्यांच्यावर परस्पर उपचार केल्याचे लक्षात आल्यास संबंधित डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्याचा इशारा महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिला आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच, अनेकजण सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी असतानाही कोरोना टेस्ट करून घेत नसल्याची बाब समोर आली आहे. दुसरीकडे शहरातील अनेक रुग्णालयांत तसे रुग्ण परस्पर किरकोळ उपचार घेऊन घरी परत जात आहेत. काही दिवसांनी आजार वाढल्यानंतर त्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह येत असून, अशा रुग्णांचाच मृत्यू होत असल्याची बाब निदर्शनास येऊ लागली आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील मृत्यूदर कमी करून कोरोनाची साखळी खंडित करण्याच्या दृष्टीने महापालिका आयुक्तांनी कंबर कसली आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत आयुक्तांनी खासगी रुग्णालयांसाठी स्वतंत्र आदेश काढून त्यांना सक्त सूचना केल्या होत्या. त्यानुसार त्यांच्याकडे येणाऱया रुग्णांची नोंद दररोज ठेवावी, कोरोनासदृश लक्षणे असलेल्यांची उपचारांपूर्वी कोरोना टेस्ट करावी अथवा त्यांची माहिती जवळील नागरी आरोग्य केंद्राला द्यावी, असे निर्देश दिले होते. मात्र, काही रुग्णालयांमध्ये रुग्णांच्या नोंदी अद्ययावत नाहीत, काही रुग्णालयांनी त्यांच्याकडे उपचारांसाठी आलेल्या रुग्णांची कोरोना टेस्ट न करताच त्यांच्यावर तात्पुरते इलाज केल्याची बाब आयुक्तांच्या निदर्शनास आली. त्यामुळे आयुक्तांनी आता खासगी रुग्णालयांवरच कारवाई सुरू केली आहे.

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांचा इतिहास तपासून तो कोणत्या रुग्णालयात उपचार घेत होता, त्या डॉक्टरांनी त्यांची कोरोना टेस्ट केली का, महापालिकेच्या नागर आरोग्य केंद्राला त्याची खबर दिली का, याचा शोध त्यातून घेतला जात आहे. त्यात एखाद्या खासगी डॉक्टरने त्या रुग्णाची माहिती लपवून लक्षणे असतानाही टेस्ट न करताच परस्पर उपचार केल्याचे लक्षात आल्यास संबंधित डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्याचा इशारा आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिला.

सोलापूर शासकीय रुग्णालयातील नियमित शस्त्रक्रिया थां विल्या

n सिव्हिल हॉस्पिटल हे डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल आहे. येथे कोरोना आजार असलेल्या गंभीर रुग्णांवर उपचार केले जातात. फक्त कोविडसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या ‘ए’ ब्लॉकची क्षमताही 165 पर्यंत वाढविण्यात आली असताना, तो ब्लॉकही फुल्ल झाला आहे. तर, ‘बी’ ब्लॉकमधील कोविड वॉर्डही रुग्णांनी भरून गेला आहे. रुग्णांवर उपचार करणाऱया, शस्त्रक्रिया करणाऱया डॉक्टरांना कोरोना रुग्णांवर उपचार करण्याचे काम दिले आहे. त्यामुळे शस्त्रक्रिया करणाऱया तज्ञांची कमतरता भासत आहे. कोरोना वाढत असताना शस्त्रक्रिया केल्या तर त्या रुग्णालादेखील धोका होऊ शकतो. यामुळे नियमित शस्त्रक्रिया तात्पुरत्या थांबविण्यात आल्या आहेत.

तातडीच्या शस्त्रक्रिया सुरूच राहणार

n नियमित शस्त्रक्रिया थांबविण्यात आल्या असल्या, तरी कोरोना संसर्गाच्या काळात प्रसूती, अपघात, तसेच अन्य प्रकारच्या अपघातांच्या तातडीच्या शत्रक्रिया सुरूच ठेवण्यात आल्या आहेत. ज्या शस्त्रक्रिया काही काळाने केल्या तर रुग्णांच्या जीविताला धोका नाही, अशाच शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्याचे रुग्णालय प्रशासनातर्फे सांगण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या