सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ येथे एका महिला डॉक्टरने गळफास घेऊन आत्महत्या केली. डॉ. रश्मी संतोष बिराजदार असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. मोहोळ शहरातील ही दुसरी घटना असून, जिल्ह्यात तीन महिन्यांत तीन महिला डॉक्टरांनी आत्महत्या केल्याने जिल्हा हादरला आहे.
मोहोळ येथील आंबेडकर चौक येथे डॉ. रश्मी संतोष बिराजदार (वय 36) यांचे मोहोळ हॉस्पिटल असून, त्यांचे पती स्टेशनरी दुकान चालवितात. दुपारी दीडच्या सुमारास डॉ. बिराजदार यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. सदरची घटना हॉस्पिटलमधील कर्मचारी सलीम मकानदार याने पती संतोष बिराजदार यांना सांगितली. डॉ. रश्मी यांना खाली उतरवून उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले असता, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेची नोंद मोहोळ पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली आहे.
दरम्यान, महिला डॉक्टरच्या आत्महत्येची सोलापूर जिल्ह्यातील सलग तिसरी घटना आहे. यापूर्वी सांगोला येथील डॉ. ऋचा सूरज रुपनूर आणि मोहोळ तालुक्यातील पेनूर येथील डॉ. जयश्री प्रशांत गवळी (वय 36) यांनीही गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेने सोलापूरचे वैद्यकीय क्षेत्र हादरले असून, आत्महत्या करणाऱ्या तीनही डॉक्टर चाळीशीच्या आतील आहेत.