हिप्परगा तलाव ओव्हरफ्लो; दत्तनगरमध्ये शिरले पाणी

सोलापूर आणि तुळजापूर तालुक्यांत पडलेल्या धुवांधार पावसामुळे सोलापूर शहराला पाणीपुरवठा करणारा हिप्परगा तलाव ओव्हरफ्लो झाला असून, तलावातून सोडलेल्या पाण्यामुळे शहराजवळील आदिला नदीतील पाण्याची पातळी प्रचंड वाढली आहे. त्यामुळे शहरालगतच्या दत्तनगरमध्ये पाणी शिरले असून, अंतर्गत रस्ते पाण्याखाली गेले आहेत. दरम्यान, जुना पूल नाक्याजवळील पूलही सध्या पाण्याखाली आहे.

सोलापूर शहराला पाणीपुरवठा करणारा हिप्परगा तलाव सध्या ओव्हरफ्लो झाला आहे. त्यामुळे जलसंपदा विभागाने तलावाच्या सांडव्यातून विसर्ग सुरू केला असून, आदिला नदीत (बाळे नाला) पाण्याचा प्रचंड प्रवाह सुरू आहे. या नदीलगतच अनेक नगरे वसविण्यात आली आहेत. या पाण्याच्या विसर्गामुळे मडकीवस्ती, गणेशनगर, यशनगर, बनशेट्टीनगर, अभिमानश्रीनगर, आर्यनंदीनगर, थोबडेनगर, संतोषनगर, तोडकर वस्ती, राहुलनगर आदी भागांत मोठय़ा प्रमाणावर पाणी शिरल्याने रस्ते पाण्याखाली आहेत. त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडत आहे. अनेक नगरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांना घराबाहेर पडणेही मुश्किल बनले आहे.

पाऊस आणि आदिला नदी (बाळे नाला) मुळे जुना पूल नाक्याजवळील पूल पाण्याखाली आहे. अनेकांच्या घरांत पाणी शिरण्याचा धोका निर्माण झाल्याने 30हून अधिक कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले आहे. गेल्या दीडशे वर्षांत या नदीला पाचव्यांदा पूर आला आहे.

दरम्यान, हिप्परगा तलावातील पाण्यामुळे सोलापूर-तुळजापूर महामार्गावरील शेळगी येथील ओढय़ालाही मोठा पूर आला आहे. पाणी महामार्गावर आल्याने वाहनांची मोठय़ा प्रमाणावर तारांबळ उडत होती. अनेक वस्त्यांत पाणी शिरले असून, वाहतुकीला मोठय़ा प्रमाणावर अडथळा निर्माण झाला होता. बहिहिप्परगे, वरळेगाव, वडजी, खडकी, धोगी या गावांचा संपर्कही तुटला आहे. आठवडाभरापासून सुरू असलेल्या पावसामुळे नदी, नाले, ओढे, तुडुंब भरले असून, अनेकांच्या शेतात पाणी शिरले आहे.