साडेसात लाखांची चोरी; मोलकरणीला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

व्यापाऱयाच्या घरी साडेसात लाख रुपयांची चोरी करणाऱया मोलकरणीला पोलिसांनी अटक केली आहे. तिच्याजवळून चोरीतील दागिने व रोकड जप्त करण्यात आली आहे. निकिता अनिकेत बनसोडे (रा. मिलिंदनगर बुधवार पेठ) असे अटकेतील मोलकरणीचे नाव आहे. चोरीचे दागिने विक्रीसाठी घेऊन जाताना तिला गजबजलेल्या शिवाजी चौक परिसरात ताब्यात घेण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

बुधवार पेठ येथील अयोध्यानगर येथे राहणारे विष्णूकांत नंदकिशोर राठी हे व्यापारी आहेत. त्यांच्या घरातील बेडरूममध्ये असलेल्या कपाटातील साडेसतरा तोळे वजनाचे दागिने आणि 45 हजार रुपये रोख अशा 7 लाख 41 हजार रुपयांची चोरी झाली होती. याप्रकरणी फौजदार चावडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

राठी यांच्या घरी मोलकरणीसह 10 नोकर आहेत. या सर्वांची कसून चौकशी सुरू होती. दरम्यान, दोन महिन्यांपूर्वी कामास आलेल्या निकिता बनसोडे हिच्यावर पोलिसांचा संशय होता. दुपारच्या सुमारास निकिता बनसोडे ही चोरीतील दागिने विक्रीसाठी घेऊन जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी पाळत ठेवून शिवाजी चौक परिसरात तिला ताब्यात घेतले असता, तिच्याजवळ चोरीचे दागिने आढळले. तिच्याजवळून चोरीतील दागिने व 40 हजार रुपयांची रोकड अशा 7 लाख 36 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून अटक करण्यात आली आहे.