
सोलापूर शहरात फसवणुकीचा फंडा समोर आला असून, जिल्हाधिकाऱयांचा ड्रायव्हर असल्याचे सांगून एका सोनाराजवळून आठ सोन्याच्या अंगठय़ा व तीन लॉकेट घेऊन गायब झाला आहे. या फसवणुकीच्या घटनेने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात खळबळ उडाली आहे.
अय्याज मकबुल मुल्ला (रा. विजापूर रोड, सोलापूर) असे फसवणूक झालेल्या सोनाराचे नाव असून, संदीप वाघमारे असे तोतया ड्रायव्हरचे नाव आहे. अय्याज मुल्ला याचे निहाल ज्वेलर्सचे दुकान आहे. दुपारी साडेअकराच्या सुमारास दुकानात ‘मी कलेक्टर साहेबांच्या गाडीचा ड्रायव्हर आहे. माझे नाव संदीप वाघमारे असून, कलेक्टरसाहेब मिटिंगसाठी आलेल्या लोकांना सोन्याच्या अंगठय़ा व लॉकेट गिफ्ट करणार आहेत’, असे म्हणून आठ अंगठय़ा व तीन लॉकेट बनवून घेऊन तो सोनारासह जिल्हाधिकारी कार्यालयात आला.
तेथे आल्यानंतर संदीप वाघमारे याने मुल्ला याला बाहेर थांबविले व अंगठय़ा व लॉकेट घेऊन तो बिल आणण्याचा बहाणा करून कार्यालयात गेला तो परतलाच नाही. सोनाराने या परिसरात संशयिताचा शोध घेतला. परंतु तो मिळून आला नाही. सुमारे दीड लाख रुपयांची फसवणूक झाली असून, मुल्ला याने विजापूरनाका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.





























































