सोलापुरात शेततळ्यात बुडून आईसह दोन चिमुकल्या मुलींचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पाथरी येथे शेततळ्यात बुडून आईसह दोन चिमुकल्या मुलींचा मृत्यू झाल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. गेल्या 15 दिवसांतील उत्तर सोलापूर तालुक्यातील ही दुसरी घटना आहे. ही घटना ‘घात आहे की अपघात’, अशी चर्चा सुरू आहे.

सारिका अक्षय ढेकळे (वय 24), गौरी अक्षय ढेकळे (वय 4) व आरोही अक्षय ढेकळे (वय 2) अशी मृत माय-लेकींची नावे आहेत. उत्तर सोलापूर तालुक्यातील पाथरी येथे अक्षय ढेकळे यांची शेती आहे. त्यांच्या शेजारी असणारे अशोक फुलचंद गुंड यांची शेती आहे. त्यांनी शेतात शेततळे केले आहे. दुपारच्या सुमारास या शेततळ्यात सारिका ढेकळे, गौरी आणि आरोही यांचे मृतदेह आढळले.

या तिघींचा मृत्यू पाय घसरून पडल्यामुळे की त्यांनी आत्महत्या केली, याबाबत संशय व्यक्त केला जात आहे. तालुका पोलिसांनी घटनास्थळी येऊन तिघींचेही मृतदेह बाहेर काढले. दरम्यान, 15 दिवसांपूर्वी उत्तर सोलापूर तालुक्यातील मार्डी येथे सरपण आणण्याकरिता गेलेल्या आकांक्षा बडजे, पूजा गरड, सानिका गरड या तीन मुलींचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला होता.