
मराठवाड्यासह दक्षिण महाराष्ट्रातही परतीच्या पावसाने धूमशान घातले आहे. मुसळधार पावसामुळे सीना नदीला पूर आल्याने रस्ते वाहतुकीसह रेल्वेमार्गही ठप्प झाला आहे. लांबोटी पुलावर पाणी आल्याने पुणे-सोलापूर महामार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. तसेच रेल्वेच्या पुलापर्यंत पुराचे पाणी लागल्याने रेल्वे वाहतूकही ठप्प झाली आहे.
सीना नदीच्या प्रवाहात मोठी वाढ झाल्याने मोहोळ तालुक्यातील लांबोटी पुलावर पाणी पोहोचल्याने सुरक्षेच्या कारणास्तव महामार्ग बंद करण्यात आला. रात्री 1 वाजल्यापासून दोन्ही बाजूने वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्याचबरोबर सोलापूर-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्ग देखील बंद ठेवण्यात आला आहे. सीना नदीचा प्रवाह कमी होईपर्यंत वाहतूक बंद राहण्याची शक्यता आहे.
सीना नदीला पूर आल्याने सोलापूरकडे येणाऱ्या आणि सोलापुरातून जाणारा रेल्वे मार्गही ठप्प झाला आहे. पाऊस आणि सीना नदीला आलेल्या पुरामुळे रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले आहे. सोलापूर मुंबई वंदे भारत एक्सप्रेस आणि हुतात्मा एक्सप्रेस या दोन्ही गाड्या सोलापूर स्टेशनवर थांबण्यात आल्या आहेत. तर मोहोळ तालुक्यातील मुंढेवाडी येथे मुंबईवरून येणाऱ्या सिद्धेश्वर एक्सप्रेससह 3 रेल्वे मध्यरात्रीपासून थांबवण्यात आल्या आहेत.