सोलापूर आगारातून ‘रातराणी’च्या तीन फेऱ्य़ा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना विषाणूचा संसर्ग कमी झाल्याने जिल्ह्यात निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. त्यामुळे मागील दोन महिन्यांपासून बंद असलेली एसटीची चाके पुन्हा धावू लागली आहेत. त्यामुळे सोलापूर विभागातून सोडण्यात येणाऱ्य़ा रातराणीच्या फेऱ्य़ांपैकी सोलापूर आगारातून पुणे, नाशिक, ठाणे या रातराणीच्या तीन फेऱ्य़ा सुरू असल्याची माहिती सोलापूर आगारातून देण्यात आली आहे.

लॉकडाऊनच्या काळात केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्य़ांसाठी एसटी धावत होती. मात्र, अनलॉकमध्ये सर्वसामान्यांचा प्रतिसाद वाढला आहे. एसटी महामंडळाकडून काही शहरांतील फेऱ्य़ांचे नियोजन करण्यात येत आहे. हळूहळू निर्बंध आणखी शिथिल होत असल्याने फेऱ्य़ांची संख्याही वाढत आहे. या बसला प्रवाशांचा प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. सध्या पुणे, ठाणे, कोल्हापूर, नांदेड, उमरगा, बार्शी, अक्कलकोट, वाई, संभाजीनगर, इचलकरंजी, लातूर, मंगळवेढा, पंढरपूर आदी मार्गांवर फेऱ्य़ा सुरू झाल्या आहेत.

कोरोनामुळे एसटी महामंडळाबरोबरच खासगी बसच्या उत्पन्नावरही मोठा परिणाम झाला आहे. बहुतांश खासगी बस अजूनही उभ्या आहेत. प्रवाशांनी कोरोनाची धास्ती घेतली आहे. खासगी बसचे तिकीटदर जास्त असल्याने प्रकासी तिकडे फिरवत नसल्याचे दिसून येत आहे.

अनलॉकनंतर एसटीच्या प्रवासी संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. त्यामुळे सोलापूर आगारातून रातराणीच्या फेऱ्य़ा सुरू करण्यात आलेल्या आहेत. येत्या काळात आणखीन यामध्ये वाढ करण्यात येणार आहे. – प्रमोद शिंदे, स्थानकप्रमुख.