
औज आणि चिंचपूर बंधाऱ्यात सोलापूर शहराला पिण्यासाठी केवळ दहा दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक असल्यामुळे उजनी धरणातून आजपासून चार दरवाजांतून 6 हजार क्युसेक्स वेगाने पाणी सोडण्यास प्रारंभ केला आहे. हे पाणी 232 किलोमीटरचे अंतर पार करून 20 मेपर्यंत सोलापुरात पोहोचल्यानंतर 21 मेपासून पाणी सोडणे बंद करण्यात येणार असल्याची माहिती जलसंपदाचे सोलापूर विभागाचे अधीक्षक अभियंता धीरज साळे यांनी दिली.
औज आणि चिंचपूर बंधाऱयात सोलापूर शहराला पिण्यासाठी केवळ दहा दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक असल्यामुळे उजनी धरणातून भीमा नदीत तातडीने पाणी सोडण्यात यावे, असे पत्र सोलापूर महापालिका आयुक्तांनी दिले होते. या मागणीनुसार उजनी धरणातून सोलापूरसाठी पाणी सोडण्यात आले आहे. या पाण्यामुळे सोलापूरसह पंढरपूर, सांगोला मंगळवेढा आदी शहरांना फायदा होणार आहे.
उजनी मायनसमध्ये
शुक्रवारी (दि. 6) उजनी धरणाची पाणीपातळी ‘मायनस’मध्ये गेली आहे. त्यामुळे सध्या धरणात मायनस 3.60 टक्के पाणीसाठा आहे. तर मृतसाठय़ातील 61 टीएमसी पाणी शिल्लक आहे.
अवकाळीनंतर उन्हाचा तडाखा, सोलापूर @ 41.5
अवकाळी व गारपिटीनंतर आता सोलापूरला उन्हाचा तडाखा बसत असून, गुरुवारी 41.5 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे. गेल्या महिनाभरात सोलापूरच्या तापमानात प्रचंड बदल होत आहेत. गारपीट व अवकाळीने शेतीचे नुकसान होत आहे. दिवसा उच्चांकी तापमान, तर रात्री पावसाची हजेरी अशी स्थिती असताना गेल्या चार दिवसांपासून तापमानात सातत्याने वाढ होत आहे. गेल्या तीन दिवसांत सरासरी 40 अंश तापमान असून, गुरुवारी 41.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. या वाढलेल्या तापमानाने सोलापूरकर हैराण झाले आहेत.


























































