सोलापूर महापालिकेच्या प्राणिसंग्रहालयातील मकाऊ पोपटाचा भूकबळी

सोलापूर महापालिकेच्या महात्मा गांधी प्राणिसंग्रहालयातील मकाऊ पोपटाचा अन्नपाण्याविना मृत्यू झाल्याने अॅनिमल किपर भारत शिंदे व प्राणिसंग्रहालयप्रमुखावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोलापूर महापालिकेच्या वतीने विजापूर रोडवरील रेवणसिद्धेश्वर मंदिर परिसर येथे महात्मा गांधी प्राणिसंग्रहालय आहे. या संग्रहालयात देशी व विदेशी पक्षी ठेवण्यात आले आहेत. यात हैदराबादहून सुमारे तीन लाख रुपये खर्चून दोन मकाऊ पोपट आणण्यात आले होते. सध्या अनेक पक्षी गायब झाले आहेत. नुकताच एका मकाऊ पोपटाचा मृत्यू झाला.

त्यानंतर आणखी एका पोपटाचा दोन दिवसांपूर्वी मृत्यू झाला. या पोपटाचे शवविच्छेदन झाल्यानंतर अन्नपाण्याविना त्याचा मृत्यू झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. यामुळे प्राणिमित्रांत संतापाची लाट उसळली आहे. याप्रकरणी विजापूरनाका पोलीस स्टेशनमध्ये प्राणिसंग्रहालयाचे अॅनिमल किपर भारत शिंदे व प्राणिसंग्रहालयप्रमुख या दोघांवर प्राणी क्लेश कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास मुरकुटे करीत आहेत.