
खगोलीय घटनांमध्ये दुर्मिळ समजले जाणारे कंकणाकृती सूर्यग्रहण 26 डिसेंबर रोजी हिंदुस्थानात दिसणार आहे. हे सूर्यग्रहण कर्नाटक, केरळ आणि तामीळनाडू येथील काही भागांतून दिसेल. उर्वरित हिंदुस्थानातून हे सूर्यग्रहण खंडग्रास स्थितीमध्ये दिसेल. नऊ वर्षांपूर्वी म्हणजे 15 जानेवारी 2010 रोजी सूर्यग्रहणाची कंकणाकृती स्थिती हिंदुस्थानातून दिसली होती.
याविषयी अधिक माहिती देताना खगोल अभ्यासक, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले, खग्रास सूर्यग्रहण आणि कंकणाकृती सूर्यग्रहणाचे निरीक्षण करण्याची संधी खगोलप्रेमींना मिळणार आहे. 26 डिसेंबर रोजी होणार्या सूर्यग्रहणाची कंकणाकृती स्थिती कर्नाटक, तामीळनाडू आणि केरळ या तीन राज्यांतील काही भागांतून दिसणार आहे. यामध्ये कोइम्बतूर, धरमपूरम, दिंडीगुल, एरोडे, कान्हनगड, कन्नूर, करूर, कोझिकोडे, मदेकेरी, मंगलोर, मंजेरी, उटी, फाल्लकड, पायन्नूर, पोलची, पुडुकोटल, लिरूचीपल्ली, तिरुपूर आदी ठिकाणे आहेत. साधारणतः दोन ते तीन मिनिटे खग्रास स्थिती तेथून दिसणार आहे. उर्वरित हिंदुस्थानातून या सूर्यग्रहणाची खंडग्रास स्थिती वेगवेगळ्या केळी दिसणार आहे.
तब्बल 9 वर्षांनी योग
मुंबई येथे सकाळी 8.04 ते 10.55 या वेळेत हे सूर्यग्रहण दिसणार आहे. पुणे येथून 8.05 ते 10.58 या वेळेत हे सूर्यग्रहण दिसणार आहे. साधारणतः 78 टक्के सूर्यबिंब ग्रासलेला दिसेल.
21 जून 2020 रोजी होणार्या सूर्यग्रहणाची कंकणाकृती स्थिती राजस्थान, पंजाब, हरियाणा आणि उत्तराखंडमधील काही प्रदेशांतून दिसणार आहे. त्यानंतर 21 मे 2031 रोजी होणार्या सूर्यग्रहणाची कंकणाकृती स्थितीही हिंदुस्थानातून दिसणार असल्याचे दा. कृ. सोमण यांनी सांगितले.


























































