
सीमेवर आपले प्राण पणाला लावून मातृभूमीचे रक्षण करणाऱया लाखो सैनिकांच्या सन्मानासाठी, त्यांना मानवंदना देण्यासाठी ‘फिटिस्तान-एक तंदुरुस्त (फिट) भारत’ यांच्यातर्फे रविवार, 14 ऑगस्टला ‘सोल्जरॅथॉन 3’ या अनोख्या फ्रीडम रनचे देशभरात आयोजन करण्यात येणार आहे. या रनमध्ये 13 हजारांहून अधिक धावपटू धावणार आहेत.
सोल्जरॅथॉन 3 या रनचे वैशिष्टय़ म्हणजे रनमधील प्रस्तावित 7.5 किलोमीटर अंतर 75 मिनिटांमध्ये पायी चालत किंवा सायकलने (सायकलिंग) पार करायचे आहे. स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षपूर्तीचे औचित्य साधून देशातील 115 ठिकाणी एकाच वेळी फ्रीडम रन होणार आहे. संरक्षण दलाच्या गौरवार्थ होणाऱया रनमध्ये 13,138 रनर धावणार आहेत. सोल्जरॅथॉन 3 या फ्रीडम रनला 14 ऑगस्ट रोजी सकाळी 6.30 वाजता देशभरातून एकाच वेळी सुरुवात होईल. रनसाठी आवश्यक पदक, टी-शर्ट आणि अन्य उपाययोजना सोल्जरॅथॉन टीमकडून पुरवल्या जातील. फिटिस्तानची स्थापना मेजर डॉ. सुरेंद्र पुनिया (स्पेशल फोर्समधील माजी अधिकारी) आणि शिल्पा भगत (माजी मिसेस इंडिया वर्ल्ड) यांनी केली आहे.



























































