कश्मीरात जवानाचे अपहरण, दहशतवाद्यांनी घरात घुसून पळवून नेले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फाईल फोटो

सामना प्रतिनिधी । श्रीनगर

जम्मू-कश्मीरात दहशतवादी हल्ल्याच्या घटना सुरूच असतानाच आज बडगाम जिल्ह्यात एका जवानाचे अपहरण करण्यात आले आहे. घरात घुसून दहशतवाद्यांनी पळवून नेल्याचे कुटुंबियांनी सांगितले.

जम्मू-कश्मीर लाईट इन्फंट्रीचे जवान मोहम्मद यासिन भट हे सुट्टीवर बडगाम जिल्ह्यातील काझीपोरा येथे आपल्या घरी आले होते. शुक्रवारी रात्री अज्ञात बंदुकधारी घरामध्ये घुसले आणि जवान यासिन भट यांना घेऊन गेले. यासंदर्भात कुटुंबियांनी तातडीने सुरक्षादलांशी संपर्क साधला. लष्करी जवान आणि पोलिसांनी काझीपोरा परिसर आणि बडगाम जिल्ह्यात सर्च ऑपरेशन सुरू केले आहे. रात्री उशिरापर्यंत हे ऑपरेशन सुरू होते.

जवान औरंगजेबचे अपहरण करून हत्या

कश्मीर खोर्‍यातून यापूर्वीही जवानांचे अपहरण केल्याच्या घटना घडल्या आहेत. जून 2018 मध्ये राष्ट्रीय रायफल्सचे जाँबाज जवान औरंगजेब यांचे शोफियाँ येथून दहशतवाद्यांनी अपहरण केले होते. दुसर्‍या दिवशी जवान औरंगजेब यांची भयंकर हत्या करण्यात आली होती.