
एका सैनिकाला गुप्तांगावर नाझींचं चिन्ह असलेला टॅटू काढून तो फोटो व्हायरल केल्याप्रकरणी कारावासाची शिक्षा झाली आहे. तसंच त्याच्यावर नाझी विचारसरणीला जाहीररित्या समर्थन दिल्याचा आरोप आहे.
हा सैनिक ऑस्ट्रियाचा असून ऑस्ट्रियन न्यायालयाने त्याला 19 महिन्यांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. या देशाच्या कायद्यानुसार, नाझी विचारसरणीला समर्थन देणं हा गुन्हा आहे. त्यानुसार, या सैनिकाला शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
या सैनिकाचं नाव उघड होऊ शकलेलं नाही. त्याने आपल्या गुप्तांगावर नाझींचं चिन्ह असलेला टॅटू काढला होता. त्याने त्याचे फोटोही व्हायरल केले होते. तसंच दारूच्या नशेत आपल्या सैन्यातील सहकाऱ्यांसमोर तो दाखवलाही होता.
त्यानंतर जेव्हा या सैनिकावर खटला दाखल झाला तेव्हा त्याने नाझी विचारसरणीचं समर्थन केल्याचेही आरोप त्याच्यावर झाले. त्याने नाझींशी संबंधित म्युझियमचे, हिटलर असं नाव असलेल्या वाईनचे फोटो टाकले होते. तसंच, नाझी विचारसरणीचं समर्थन करणाऱ्या पोस्टही टाकल्या होत्या.
या प्रकरणी त्याला त्याचा कबुलीजबाब विचारला गेला, तेव्हा त्याने आपण वाईट संगतीला लागल्याचं सांगितलं. टॅटू काढला तेव्हा दोन बाटल्या व्हिस्की प्यायलो होतो. आता तो टॅटू नाहीसा झाला आहे, असंही तो म्हणाला.
आता मी सुधारलो असून यापुढे माझ्या हातून असं कृत्य घडणार नाही, अशी खात्री देतो, असं तो म्हणाला. कोर्टाने त्याच्या या कृत्यावर त्याला 19 महिन्यांची शिक्षा ठोठावली आहे.





























































