कचरामुक्त मुंबईसाठी इंदोर पॅटर्न!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ओल्या कचऱयापासून खत-बायोगॅस निर्मिती, चार प्रकारांत विलगीकरण, प्लॅस्टिकचा पुनर्वापर, शिल्लक राहणारे अन्न गरजूंना मिळण्यासाठी रोटी-फूड बँक आणि कचरा व्यवस्थापनासाठी शहर, पूर्व-पश्चिम उपनगरासाठी स्वतंत्र ऍपच्या माध्यमातून इंदोरच्या धर्तीवर मुंबई कचरामुक्त करण्यात येणार आहे. अत्याधुनिक पद्धतीने कचरा व्यवस्थानाबाबत शिवसेनेने आज विशेष सभेत हा प्रस्ताव मांडला. याला सर्वपक्षीयांनी जोरदार पाठिंबा दिला.

कचरा व्यवस्थापनावर चर्चा करण्यासाठी आयोजित विशेष महासभेत आज सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी मध्य प्रदेशातील इंदोर महानगरपालिकेच्या धर्तीवर कचरा व्यवस्थापन करण्यासाठी अनेक उपाययोजना सुचवल्या. महापौर किशोरी पेडणेकर, सभागृह नेत्या विशाखा राऊत यांच्यासह नगरसेवकांच्या टीमने इंदोरमध्ये अभ्यास दौरा केला होता. या ठिकाणी असणाऱया कचरा व्यवस्थापनाच्या अत्याधुनिक योजना मुंबई राबवण्याबाबत यावेळी पालिका प्रशासनाला सूचना करण्यात आल्या.

तब्बल साडेतीन तास चाललेल्या चर्चेत अनेक नगरसेवकांनी कचरा व्यवस्थापनावर आपले मत मांडले. यामध्ये आणखी अनेक नगरसेवकही आपले मत मांडणार आहेत. त्यामुळे उपमहापौर ऍड. सुहास वाडकर यांनी यावेळी आजची सभा तहकूब केली. विरोधी पक्षनेते रवी राजा, राष्ट्रवादीच्या गटनेत्या राखी जाधव, सुधार समिती अध्यक्ष सदा परब, ‘बेस्ट’ समिती अध्यक्ष अनिल पाटणकर, नगरसेविका शुभदा गुढेकर, राजूल पटेल, नगरसेवक अनिल कोकीळ, सचिन पडवळ, संजय घाडी, अनंत (बाळा) नर, भाजपचे अभिजित सावंत, प्रकाश गंगाधरे, शाहनवाझ शेख, रिटा मकवाना, आदींनी यावेळी स्वच्छतेबाबत प्रशासनाला तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी केली. दरम्यान, भापजच्या नगरसेवकांना बोलण्याची संधी मिळत असतानादेखील रात्री पावणे आठ वाजताच्या सुमारास आपल्याला बोलू दिले जात नसल्याचे सांगत सभागत्याग केला. या पार्श्वभूमीवर भाजप नाहक राजकारण करीत असल्याचे शिवसेनेकडून स्पष्ट करण्यात आले.

असा आहे इंदोर पॅटर्न

z कचरा संकलन ओला, सुका, प्लॅस्टिक आणि हेझॅडर्स प्रकारात
z ओल्या कचऱयापासून निर्मित खताचा वापर शेती-उद्यानांसाठी
z कचरा संकलनासाठी टिकावू स्टील भांडय़ांची व्यवस्था
z नारळ-शहाळ्यांपासून विविध वस्तूंच्या निर्मितीसाठी अनुदान
z दत्तक वस्ती योजनेचे दिवसाचे 180 रुपये असलेले अनुदान वाढवणे
z कचरा व्यवस्थापनासाठी परिणामकारक जनजागृती
z ‘स्वच्छता मित्रां’साठी सुरक्षा कीट, ड्रेस कोड बंधनकारक
z गल्ल्यांमध्ये जाऊ शकणाऱया कचरा संकलन छोटय़ा गाडय़ा
z निर्माल्यापासून शिर्डीच्या धर्तीवर सुगंधी अगरबत्ती तयार करून बचतगटांसाठी रोगजार निर्मिती करण्याची कल्पनाही यावेळी मांडण्यात आली.

बेस्टसाठी इंधन मिळणार

मंडयांतील भाज्यांचा कचरा, गोठय़ांतील शेणापासून निर्मित बायोगॅसचा उपयोग इंदोरमध्ये गाडय़ांमध्ये इंधन म्हणून करण्यात येतो. याच धर्तीवर मुंबईत योजना राबवल्यास ‘बेस्ट’ गाडय़ांसाठी इंधन उपलब्ध होणार आहे.