सातारा जिल्ह्यातील 1500 गावांत सांडपाणी, घनकचरा प्रकल्पाचे काम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ग्रामीण भागात आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक असणारा सांडपाणी व घनकचरा प्रकल्पवेगाने सुरू आहे. सध्या जिल्ह्यात 723 गावांमध्ये दोन्ही प्रकल्प पूर्णत्वास गेले आहेत, तर 1 हजार 499 गावांत प्रकल्पाचे काम सुरू आहे. या प्रकल्पांमुळे गावागावांमध्ये पर्यावरणाचा समतोल राखून सार्वजनिक आरोग्य उत्तम राहण्यास मदत होणार आहे.

‘स्वच्छ भारत मिशन’ अंतर्गत ग्रामस्तरावरील सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाचे प्रकल्प उभारणीस वेग घेत आहेत. ग्रामीण भागात स्वच्छता शाश्वत स्वरूपात टिकवण्यासाठी घनकचरा व सांडपाणी, गोबरधन, मैला गाळ, प्लॅस्टिक कचरा यांच्या व्यवस्थापनासाठी कामे सुरू आहेत. या योजनेसाठी ग्रामपंचायतीची निवड करताना गावची लोकसंख्या, वैयक्तिक स्वच्छतागृहांची व्याप्तीची संख्या लक्षात घेतली जाते. पाच हजार लोकसंख्येच्या आतील गावांत सांडपाण्यासाठी प्रतिव्यक्ती 280 रुपये, तर घनकचरा व्यवस्थापनासाठी प्रतिव्यक्ती 60 रुपये व पाच हजार लोकसंख्येपेक्षा अधिक गावांत प्रतिव्यक्ती 600 रुपये, तर घनकचरा व्यवस्थापनासाठी 45 रुपये अनुदान देण्यात येते.

दरम्यान, जिल्ह्यात पाच हजार लोकसंख्येवरील एकूण 72 ग्रामपंचायतींपैकी 59 गावांचे प्रकल्प आराखडे तयार झाले आहेत. 13 गावांचे सर्वेक्षण सुरू आहे. प्रशासकीय मंजुरीसाठी 45 ग्रामपंचायती प्रस्तावित आहेत. 35 गावांना प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. जिह्यात पाच हजार लोकसंख्येच्या आतील एक हजार 660 ग्रामपंचायती आहेत. एक हजार 534 गावांच्या अंदाजपत्रकांना तांत्रिक मंजुरी व एक हजार 499 गावांमधील कामे सुरू आहेत.

सातारा जिल्ह्यात 723 गावांमध्ये प्रकल्प पूर्णत्वास गेले आहेत. उर्वरित कामे तातडीने पूर्ण केली जाणार असल्याची माहिती स्वच्छता व पाणीपुरवठा विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी किरण सायमोते यांनी दिली.

प्रत्येक तालुक्यात प्लॅस्टिक निर्मूलन केंद्र

प्लॅस्टिकचे संकलन करण्यासाठी प्रत्येक तालुक्यात प्लॅस्टिक व्यवस्थापन केंद्र उभारण्यात येणार आहे. यासाठी 11 प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. नऊ ठिकाणी टेंडर प्रक्रिया झाली आहे. या प्रकल्पांमुळे पर्यावरणीय हानी टळण्यास मदत होणार आहे.