
सामना ऑनलाईन । लातूर
पती-पत्नीत होणाऱ्या वादातून मारहाण झाल्याच्या अनेक घटना समोर येत असतात. मात्र लातूरमध्ये एक अशी घटना घडलीय जी ऐकल्यावर तुम्हाला धक्काच बसेल. एका जावयाने रागाच्या भरात आपल्या सासऱ्याच्या नाकाचा चावा घेतल्याचं समोर आलं आहे. लातूर जिल्ह्यातील भादा गावामध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये सासऱ्याच्या नाकाचा तुकडाच पडला आहे. संतोष यादव असं या जावयाचं नाव असून त्याने सासरे नागनाथ शिंदे यांच्यावर हल्ला केला.
माहेरी गेलेली पत्नी सासरी परत येत नसल्याने संतापलेल्या संतोषने हे कृत्य केलं आहे. संतोष पत्नीला सातत्याने मारहाण करत असल्याने ती त्याला वैतागून मुलांसह माहेरी गेली होती. तिला नेण्यासाठी तो भादा या गावी आला होता. त्याचवेळी त्याचा पत्नीशी वाद झाला आणि त्याने तिला मारहाण करायला सुरुवात केली. मुलीला मारहाण होताना पाहून नागनाथ शिंदे यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी संतोषने नागनाथ यांच्या नाकाचा कडकडून चावा घेतला. यामध्ये त्यांच्या नाकाचा तुकडा पडला असून ते जखमी झाले आहेत.
या संपूर्ण प्रकारानंतर नागनाथ शिंदे यांनी ठाण्यात धाव घेत आरोपी जावयाविरोधात तक्रार दाखल केली आहे. नागनाथ शिंदे यांच्या फिर्यादीवरून गु र न ७५/१८ कलम ३२४,३२३,५०४, ५०६ नुसार गुन्ह्याची नोंद करून भादाचे पोलीस निरीक्षक संजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

























































