सोनई हत्याकांडातील आरोपीला रुग्णालयात दाखल करण्यास विलंब

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नाशिक

राज्यभर गाजलेल्या नगर जिह्यातील सोनई हत्याकांड प्रकरणी फाशीची शिक्षा झालेला आरोपी प्रकाश विश्वनाथ दरंदले याची प्रकृती बिघडल्यानंतर पोलिसांवर जबाबदारी ढकलत कारागृह प्रशासनाने त्याला रुग्णालयात दाखल करण्यास विलंब केल्याची घटना गुरुवारी घडली. यामुळे कारागृहातील संशयास्पद कारभार पुन्हा चव्हाटय़ावर आला आहे.

नाशिकरोड येथील मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांच्या हत्या आणि मृत्यू हे संशयास्पद असल्याची तक्रार कारागृह कर्मचारी अनिल बुरकूल यांनी अनेकदा राज्यपालांसह, तुरुंग महानिरीक्षकांकडे केली आहे. सोनई हत्याकांडात फाशीची शिक्षा झालेले आरोपी नाशिकरोड कारागृहातच आहेत. २३ जून २०१८ ला यातील आरोपी पोपट ऊर्फ रघुनाथ विश्वनाथ दरंदले याचा छातीत दुखू लागल्याने जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. त्याला उशीरा रुग्णालयात दाखल केल्याने, वेळेवर उपचार न झाल्याने त्याचा मृत्यू झाला, हा मृत्यू संशयास्पद असल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. याच प्रकरणातील प्रकाश विश्वनाथ दरंदले याची गुरुवारी रात्री प्रकृती बिघडली. छातीत दुखू लागल्याने त्याला उपचारासाठी तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करणे आवश्यक होते, ही जबाबदारी कारागृह प्रशासनाची आहे. असे असतानाही त्यांनी नाशिकरोड पोलिसांना दरंदले यास रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले. आमची फक्त बंदोबस्ताची जबाबदारी आहे असे पोलिसांनी स्पष्ट केले. यात काही तासांचा कालावधी गेला, त्यानंतर कारागृहातील अधिकाऱयांनी प्रकाश दरंदले यास जिल्हा रुग्णालयात पोलीस बंदोबस्तात उपचारासाठी नेले. या वेळकाढूपणामुळे कारागृह प्रशासनाचा कारभार पुन्हा संशयाच्या भोवऱयात सापडला आहे.