
भाजपा नेत्या सोनाली फोगट यांच्या मृत्यूप्रकरणी स्वीय सहायक सुधीर सांगवान आणि सचिव सुखविंदर सिंग पाल यांना अटक करण्यात आली असून उद्या त्यांना म्हापसा कोर्टात हजर केले जाणार आहे.
गोवा पोलिसांनी या प्रकरणात आज खुलासा करताना म्हटले आहे की, फोगट यांचा स्वीय सहायक सुधीर सांगवान आणि सचिव सुखविंदर सिंग पाल या संशयितांनी हणजुणे येथील कर्लिस क्लब मध्ये पिण्याच्या पाण्यात रासायनिक पदार्थ (सिंथेटिक ड्रग) मिसळून जबरदस्तीने सोनाली यांना पाजले. ही कृती कर्लिस मधील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. ते पेय घेतल्या नंतर सोनाली यांना अस्वस्थ वाटू लागले होते. त्यानंतर संशयितांनी त्यांना टॉयलेटच्या दिशेने नेले. तेथे ते 2 तास होते. या दरम्यान काय झाले, याची माहिती संशयितांकडून अद्याप मिळाली नाही, असे पोलीस महानिरीक्षक ओमिवर सिंग बिश्नोई यांनी दिली आहे. सोनाली यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला नाही असे पोस्टमार्टम मधून स्पष्ट झाले असून त्यांना पाजलेल्या रासायनिक पदार्थामुळे त्यांचा मृत्यू झाल्याची शक्यता नाकारता येत नाही, असे पोलिसांचे म्हणणे आहे.
सोनाली फोगट यांची मालमत्ता आणि आर्थिक संपत्ती हडपणे तसेच त्यांची राजकीय कारकीर्द संपवण्याच्या उद्देशाने संशयितानी त्यांचा काटा काढला असावा, अशी शक्यता देखील पोलिसांनी वर्तवली आहे. सोनाली यांना कर्लिसमधून ज्या गाडीने हॉटेलमध्ये नेले आणि हॉटेलमधून ज्या वाहनातून रुग्णालयात घेऊन गेले त्या वाहन चालकांची चौकशी केली जाणार आहे. तसेच काही लोक मुंबईवरून यांच्याकडे येणार होते, याचीही माहिती समोर आली आहे. त्यांचीही कसून चौकशी केली जाणार अशी माहिती यावेळी पोलिसांनी दिली आहे.





























































