सोनिया गांधींच्या नाकातून रक्त आलं, श्वास घेण्यास त्रास; काँग्रेसकडून हेल्थ अपडेट जारी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi Health Update) यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांना कोरोनाची लागण झाली होती. कोरोनानंतर त्यांच्या नाकातून रक्त आल्याचे आणि त्यांना श्वास घेण्याची अडचण झाल्याची माहिती काँग्रेसकडून देण्यात आली आहे. काँग्रेस नेते जयराम रमेश (Congress leader Jairam Ramesh) यांनी त्यांच्या तब्येतीची माहिती दिली आहे.

सोनिया गांधी यांच्यावर दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात (Sir Ganga Ram Hospital, Delhi) उपचार सुरू आहेत. कोरोनामुक्त झाल्यानंतरच्या समस्यांचा सामना त्या करत आहेत. सोनिया गांधी यांना 2 जून रोजी कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर त्यांच्यावर यशस्वी उपचारही करण्यात आले. परंतु 12 जून रोजी त्यांच्या नाकातून रक्त येऊ लागल्याने त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

सोनिया गांधी यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर गुरुवारी त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यानंतर केलेल्या तपासणीमध्ये त्यांच्या श्वसनमार्गाच्या खालच्या भागात फंगल इन्फेक्शन (Fungal Infection) झाल्याचे दिसून आल्याचे काँग्रेसने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकामध्ये म्हटले आहे. कोरोमुक्त झाल्यानंतर दिसणाऱ्या या आणि इतर लक्षणांवर त्या सध्या उपचार घेत आहेत. तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्याच्यावर उपचार सुरू असल्याची माहितीही काँग्रेसकडून देण्यात आली आहे.

23 ला ईडी चौकशीचे समन्स

नॅशनल हेराल्ड प्रकरणी सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) सोनिया गांधी यांना समन्स पाठवले होते. 8 जून रोजी त्यांची चौकशी होणार होती. परंतु यादरम्यान त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. त्यामुळे त्या ईडी चौकशीला हजर राहू शकल्या नाहीत. त्यांनी ईडीकडे आणखी वेळ देण्याची मागणी केली होती. आता ईडीने त्यांना पुन्हा समन्स पाठवले असून 23 जून रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास बजावले आहे.

मोतिलाल वोरा यांचे नाव घेतल्याने त्यांचा मुलगा राहुल गांधींवर भडकला