सोनू, बाबू की, पिंकी…जाणून घ्या मुंबईतील टॉपची टोपणनावे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एखाद्या व्यक्तीला लाडाचे नाव दिले जाते, त्या नावाला टोपणनाव (निकनेम) म्हणतात. सोनू. छोटू, अनू, बाबू आणि पिंकी ही मुंबईतील सर्वांत लोकप्रिय टोपणनावे आहेत, अशी रंजक माहिती समोर आली आहे.

स्नॅपचॅट या व्हिज्युअल मेसेजिंग अॅपने टोपणनावांसंदर्भात नुकतेच एक सर्वेक्षण केले. त्यातून मुंबईतील टॉपच्या टोपणनावांची यादी समोर आली आहे. ‘इंडियाज टॉप निकनेम्स’ आणि ‘माय निकनेम’ या दोन लेन्सेस उपलब्ध करून दिल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर हे आगळे सर्वेक्षण करण्यात आले.

निकनेम का आवडतं…

देशातील तरुणाईला टोपणनावे (निकनेम) वापरणे आवडते, असे या सर्वेक्षणातून दिसून आलेय. नावे सुटसुटीत राहावीत हा तर यामागील उद्देश आहेच, याशिवाय खासगीपण जपणे तसेच टोपणनावे लक्षात ठेवणे सोपे असल्यामुळे ती वापरली जातात. 96 टक्क्यांहून अधिक हिंदुस्थानींनी त्यांच्या आयुष्यात कधी ना कधी टोपणनावाचा वापर केला आहे.

–आपल्या देशात टोपणनावे केवळ नावांपुरती मर्यादित नाहीत, तर व्यक्तीची स्वतःची अशी ओळख निर्माण करण्यात ती महत्त्वाची भूमिका बजावतात. टोपणनावांना ‘पेट नेम’, ‘घर का नाम’ किंवा ‘डाक नाम’ असेही म्हटले जाते.

– लोकांना टोपणनावांचा अभिमान वाटतो हे सर्वेक्षणातून दिसून आले. सार्वजनिक ठिकाणी टोपणनावांनी हाक मारली गेली तर अवघडल्याजोगे वाटत असल्याचे केवळ 15 टक्क्यांनी सांगितले. टोपणनावांच्या संकल्पनेशी भावनिक जिव्हाळा जोडलेला असतो.

– शाळेत जाण्यापूर्वी मिळालेली टोपणनावे मोठेपणीही जोडली जातात. टोपणनावे आपुलकीचा वैशिष्टय़पूर्ण भास निर्माण करतात. घरात वेगळय़ा नावाने हाक मारली जात असल्याचे 61 टक्के जणांनी सांगितले, तर अनेकदा खऱ्या नावाऐवजी टोपणनाव लोकांच्या लक्षात राहत असल्याचा अनुभव सुमारे 60 टक्के जणांनी सांगितला.