संगीताच्या शोधप्रवासाची कॅप्टन

येत्या 9 मार्चपासून सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन ‘सुपरस्टार सिंगर’चा तिसरा सीझन घेऊन येत आहे. युवा गायक पवनदीप राजन, अरुणिता कांजीलाल, सलमान अली, मोहम्मद दानिश आणि सायली कांबळे पुन्हा एकदा ‘सुपरस्टार सिंगर’च्या या तिसऱया सीझन स्पर्धेतील लहान मुलांना मार्गदर्शन करणार आहेत.

 यानिमित्ताने सायली कांबळे आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाली,  एक पॅप्टन म्हणून या होतकरू गायकांना मी मार्गदर्शन करणार आहे. मुलांच्या रूपात माझा सांगीतिक प्रवास पुन्हा जगण्याची संधी आहे. मुलांची म्युझिक पॅशन आणि विकास पाहताना मला माझे स्वतःचे ‘इंडियन आयडॉल’मधले दिवस आठवतील.  मला माझ्या मेंटर्सकडून जे मौल्यवान धडे मिळाले आहेत आणि जे मी अनुभवातून शिकले आहे, ते सगळे ज्ञान या मुलांना देण्याचा प्रयत्न असेल.

 सायली पुढे म्हणाली, सगळे संगीत प्रकार मला आवडतात. लताजी आणि आशाजींच्या सदाबहार गाण्यांपासून ते 90 च्या दशकातील थिरकणाऱया गाण्यांपर्यंत आणि चमकदार रॉक आणि पॉपपर्यंत सगळेच मला प्रिय आहे. छोटय़ा मुलांना मार्गदर्शन देताना त्यांच्या आवडत्या संगीत प्रकाराबरोबरच इतर संगीत प्रकारदेखील आजमावून बघण्यासाठी मी त्यांना प्रोत्साहन देते. वेगवेगळ्या संगीत शैलीमुळे  मुलांचे कलेचे क्षितिज विस्तारतेच, पण त्याबरोबरच  त्यांना काही मौलिक ज्ञान आणि अनुभव यांचाही लाभ होतो. माझा उद्देश त्यांना त्यांच्या संगीताच्या शोधप्रवासात मार्गदर्शन करून त्यांना स्वतःची संगीत शैली निर्माण करण्यात मदत करण्याचा आहे.