एसटीच्या थांब्यावर सिनेमा बघा! मिनी थिएटरसाठी निविदा प्रक्रिया सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, मुंबई

राज्याच्या ग्रामीण भागाची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एसटीच्या नव्या विकसित होणाऱ्या बसस्थानकांवर प्रवाशांना सिनेमा पाहण्याची सोय उपलब्ध होणार आहे. महाराष्ट्रात एसटी महामंडळामार्फत नव्याने बांधण्यात येणाऱ्या बसस्थानकांच्या इमारतीतील 60 आसनी छोटी चित्रपटगृहे बांधण्यासाठी शुक्रवारी निविदा काढण्यात आली आहे.

राज्यात महामंडळामार्फत पब्लिक प्रायव्हेट भागीदारीतून नवीन 80 बसस्थानके बांधण्यात येणार आहेत. त्यापैकी निवडक बसस्थानकांच्या इमारतींमध्ये 60 आसनी छोटी चित्रपटगृहे बांधण्याची घोषणा परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी एका भव्य कार्यक्रमात केली होती.

मराठी चित्रपटांच्या प्रमोशनसाठी वापर…!

बांधा, वापरा आणि हस्तांतर तत्त्वांवर हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. मराठी सिनेमांना सिनेमागृहे उपलब्ध नसल्यामुळे या सिनेमागृहांचा वापर मराठी चित्रपट जादास जादा प्रेक्षकांपर्यंत पोहचण्यासाठी करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.