
अफवावर विश्वास ठेवू नका. कुणी काहीही मत व्यक्त करील. रोहित शर्मा आणि विराट कोहलीने आपला फॉर्म असेपर्यंत वन डे क्रिकेट खेळत राहावे, असा दादाचा सल्ला दिलाय माजी कर्णधार सौरभ गांगुलीने.
अलीकडील काही वृत्तांमध्ये असा अंदाज वर्तवला जात आहे की, ऑस्ट्रेलियाचा आगामी दौरा हा दोघांचाही शेवटचा वनडे प्रवास ठरू शकतो, मात्र गांगुलीने या वृत्तांना निव्वळ अफवा असल्याचे म्हटलेय. रोहित-विराटबाबत काय ठरलेय किंवा काय ठरतेय, याची मला काहीही कल्पना नाही. त्यामुळे मी माझे मतही व्यक्त करू शकत नाही. पण क्रिकेटमध्ये टिकण्यासाठी एकच गोष्ट महत्त्वाची असते, ते म्हणजे फॉर्म ! जो चांगला खेळेल, तोच संघात राहील. कोहली आणि रोहित या दोघांचेही वन डेतील कामगिरी अप्रतिम आहे आणि ते या फॉरमॅटचे किंग आहेत. त्यांनी खेळत राहावे.
कसोटी आणि टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून आधीच निवृत्ती घेतलेल्या या दिग्गजांनी 2027 च्या विश्वचषकाबाबत अद्याप कोणतीही भूमिका जाहीर केलेली नाही. हिंदुस्थानचा ऑस्ट्रेलिया दौरा 19 ऑक्टोबरपासून पर्थ, अॅडलेड आणि सिडनी येथे सुरू होणार आहे. त्यानंतर डिसेंबरमध्ये आफ्रिकेविरुद्ध तीन वन डे, तर 2026 मध्ये न्यूझीलंड, अफगाणिस्तान, इंग्लंड आणि विंडीजविरुद्ध मालिका रंगणार आहेत.
आशिया कपचाही हिंदुस्थान दावेदार
9 सप्टेंबरपासून दुबईत सुरू होणाऱया टी-20 आशिया कपबाबत गांगुली म्हणाला की ‘इंग्लंडमधील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेनंतर मिळालेला आराम संघासाठी अमूल्य आहे. कसोटी क्रिकेटमध्ये मजबूत असलेला हिंदुस्थान वन डेमध्ये तर आणखी भक्कम आहे. दुबईच्या खेळपट्टीवर त्यांना हरवणे आणखीनच कठीण जाईल,’ असेही गांगुली म्हणाला.