
बेधडक कारवायांनी शत्रू राष्ट्रांना धडकी भरवणारा उत्तर कोरियाचा हुपूमशहा किम जोंग उन मंगळवारी पहिल्यांदाच भावनिक बनून रडू लागला. किमने वादळ तसेच कोरोना महामारीत देशातील जनतेला खंबीर साथ देण्यात अपयश आल्याची जाहीर कबुली दिली. याबाबत जनतेची माफी मागितली. आपण माझ्यावर विश्वास टाकलात, परंतु तुमच्या विश्वासाला मी जागलो नाही, अशी खंत किमने जनतेपुढे व्यक्त केली.
संयुक्त राष्ट्राच्या अहवालानुसार, उत्तर कोरियातील 40 टक्के लोकांना पुरेसे अन्न मिळत नाही. वादळ व कोरोना महामारीने देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली आहे. याला आपलेच अपयशी नेतृत्व कारणीभूत ठरल्याचे किमने ‘वर्कर्स पार्टी’च्या 75 व्या स्थापना दिनी कबूल केले. राजधानी प्योंगयोंगमध्ये पार पडलेल्या कार्यक्रमात देशाच्या विविध भागांतील हजारो लोक व शाळकरी मुले उपस्थित होती. माझे प्रयत्न आणि निष्ठा जनतेच्या समस्या दूर करण्यासाठी पुरसे ठरले नाहीत. तरीही जनतेचा माझ्यावर किती विश्वास आहे, याची मला जाणीव आहे, अशी भावना व्यक्त करताना किमच्या डोळ्यांत अश्रू तरळले. जनतेने पहिल्यांदाच आपल्या हुपूमशहाला चष्मा बाजूला करीत अश्रू पुसताना पाहिले. आज देशात कोरोनाचा एकही रुग्ण नसल्याचा दावा किमने केला.
सैन्याच्या पराक्रम व बलिदानाला सलाम
वर्कर्स पार्टीच्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला सैन्याच्या ताकदीचे प्रदर्शन करण्यात आले. यात क्षेपणास्त्रेही पाहायला मिळाली. यावेळी किम जोंग उनने सैन्याच्या पराक्रम आणि बलिदानाला सलाम ठोकला. सैनिकांनी ते किती खडतर परिस्थितीत काम करतात हे दाखवून दिले. याबाबत मी त्यांना धन्यवाद देतो, असे किमने म्हटले.



























































