दक्षिण मुंबईत आता मुबलक पाणीपुरवठा, मलबार हिल जलाशयाची क्षमता 190 दशलक्ष लिटरवर

दक्षिण मुंबईला पाणीपुरवठा करणाऱया ब्रिटिशकालीन मलबार हिल जलाशयाची क्षमता आता 150 दशलक्ष लिटरवरून 190 दशलक्ष लिटरपर्यंत वाढणार आहे. या प्रकल्पाच्या कामाला पालिकेने सुरुवात केली आहे. यामुळे दक्षिण मुंबईला मुबलक पाणीपुरवठा करता येणार आहे.

मलबार हिल फिरोजशहा मेहता उद्यान (हँगिंग गार्डन) परिसरात असलेला हा 135 वर्षे जुना जलाशय आहे. या जलाशयातून मंत्रालय, चर्चगेट, ताडदेव, ग्रॅण्ट रोड, गिरगाव, चंदनवाडी आदी विभागांना पाणीपुरवठा केला जातो. मलबार हिल जलाशयाची पुनर्बांधणी करताना पाणीपुरवठय़ावर परिणाम होऊ नये यासाठी पहिल्या टप्प्यात जवळच 23 दशलक्ष लिटर क्षमतेचे नवीन जलाशय व 14 दशलक्ष लिटर क्षमतेची पाण्याची टाकी उभारण्यात येणार आहे. नवीन जलाशयातून कुलाबा, फोर्ट, कफ परेड, नरिमन पॉइंट, चर्चगेट, सॅण्डहर्स्ट रोड, काळबादेवी, मलबार हिल, नेपियन सी रोड आणि ग्रॅण्ट रोड परिसरात पाणीपुरवठा केला जाणार आहे.

पालिकेच्या दरापेक्षा दुप्पट दराने काम

या जलाशयाच्या बांधकामासाठी अंदाजित केलेल्या निविदेनुसार कंत्राटदारांनी थेट 48.88 टक्के ते 64.74 टक्के वाढीव दराने निविदा भरल्या होत्या. यामध्ये सर्वात कमी वाढीव दर भरलेल्या मे. स्कायवे इन्फ्राप्रोजेक्टस या कंत्राटदाराला हे काम देण्यात आले आहे. पालिकेच्या वाटाघाटीनंतर 39.90 टक्के वाढीव दर देऊन काम करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कामासाठी एकूण 600 कोटींचा खर्च केला जाणार आहे.