‘सुवर्ण’संधी! आजपासून स्वस्तात खरेदी करा सोने; जाणून घ्या काय आहे सरकारची योजना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिवाळी आणि सणासुदीपूर्वी तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर केंद्र सरकारने तुम्हाला स्वस्तात सोने खरेदीची देत आहे. सरकारने आजपासून सॉवरेन गोल्ड बॉन्ड योजनेची (Sovereign Gold Bond Scheme) सातवी सिरीज जारी केली आहे. यानुसार आजपासून पुढील पाच दिवस अर्थात 12 ते 16 ऑक्टोबर या कालावधीत ‘सॉवरेन गोल्ड बॉन्ड’ योजनेअंतर्गत तुम्ही स्वस्तात सोने खरेदी करू शकणार आहेत.

या योजनेअंतर्गत सोन्याच्या बाँडची किंमत प्रति ग्रॅम 5,051 रुपये निश्चित करण्यात आली आहे. ऑनलाईन सोने खरेदी करणार्‍यांसाठी किंमत प्रति ग्रॅम 5001 रुपये आहे. त्यामुळे खरेदीदाराचा 50 रुपये आणखी फायदा होणार आहे. तसेच 1 ग्रॅम ते 4 किलोपर्यंत सोने खरेदी करू शकता. तर विश्वस्त संस्था साठी ही मर्यादा 20 किलोपर्यंत आहे.

काय आहे योजना?
‘सॉवरेन गोल्ड बाँड ही सोन्यातील गुंतवणुकीची योजना असून RBI ने केंद्राच्या वतीने जारी केली आहे. या योजनेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे सोन्याची फिजिकल मागणी कमी करणे आहे. ही योजना 2015 मध्ये सुरू केली गेली असून याची सातवी सिरीज आजपासून लॉन्च करण्यात आली आहे. हिंदुस्थानमधील नागरिक यात गुंतवणूक करू शकतो.

हा आहे फायदा…
दरम्यान, या बाँडचा उपयोग कर्ज घेण्यासाठी किंवा कोलॅटरलच्या स्वरूपात केला जातो. तसेच सोन्याच्या किंमतीत वाढ होण्याबरोबरच गुंतवणूकदाराला 2.5% दराने अतिरिक्त व्याजही मिळते. तसेच हे सोने डिजिटल स्वरूपात असल्याने याच्या शुद्धतेचा प्रश्न नाही, तर चोरीची भीतीही नाही. याच्या खरेदीसाठी तुमच्याकडे मतदान ओळखपत्र किंवा आधारकार्ड, पॅनकार्ड किंवा पासपोर्टची आवश्यकता आहे.