
पुण्यातील प्रसिद्ध सर परशुरामभाऊ महाविद्यालय प्रशासनाने म्हणजेच एस.पी. कॉलेज प्रशासनाने महाविद्यालयात विविध ‘डे’ साजरे करण्यास मनाई केली आहे. सर्वसाधारणपणे महाविद्यालयात रोझ डे, व्हॅलेंटाईन डे, चॉकलेट डे साजरे केले जातात. एसपी महाविद्यालयात जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात बहुतांश ‘डे’ साजरे होणार होते. मात्र आता त्याला मनाई करण्यात आल्याने विद्यार्थ्यांचा हिरमोड झाला आहे.
महाविद्यालयाने या ‘डें’च्या साजरीकरणाला विरोध केलाच आहे शिवाय या दिवशी कोणता उपद्रव होऊ नये यासाठी पोलिसांनाही योग्य तो बंदोबस्त करण्याची महाविद्यालयाकडून विनंती करण्यात आल्याचे वृत्त एका इंग्रजी वर्तमानपत्राने दिले आहे. या दिवसांमध्ये बाहेरची उपद्रवी मंडळी महाविद्यालयात येतात आणि उच्छाद मांडतात अशा लोकांना रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. साडी डे, मिक्स एन मॅच डे या सारख्या दिवसांच्या साजरीकरणासाठी पूर्वपरवानगी घेणे आवश्यक केले असून त्यासाठी अद्याप कोणी परवानगी मागितली नसल्याचे या महाविद्यालयाचे प्राचार्य दीलीप शेठ यांनी मुंबई मिरर या वर्तमानपत्राशी बोलताना सांगितले.
या निर्णयामुळे पदवीचे विद्यार्थी जसे नाराज झाले आहेत तसेच पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे विद्यार्थीही नाराज झाले आहेत. यातील काही विद्यार्थ्यांनी म्हटलंय की ‘हे दिवस म्हणजे स्वातंत्र्य उपभोगण्याचे उत्तम माध्यम असतात. या निर्णयामुळे हे स्वातंत्र्य कॉलेज विश्वात नव्याने आलेल्या अनुभवता येणार नाही.’ महाविद्यालयाने कोणतेही ‘डे’ साजरे करता येणार नाही अशा आशयाची नोटीस ही बोर्डावर लावलेली आहे. जर कोणी अशा ‘डे’ मध्ये सहभागी झाले किंवा महाविद्यालय परिसरात उपद्रम माजवल्यास त्यांच्याविरूद्ध कारवाई करण्यात येईल असं या नोटीसमध्ये म्हटलं आहे. नोटीस बोर्डावर ही नोटीस लावलीच आहे शिवाय व्हॉटसअॅपद्वारे ही नोटीस विद्यार्थी आणि शिक्षकांना पाठवण्यात आली आहे. विद्यार्थी जरी या निर्णयावर नाराज असले तरी त्यांनी याविरोधात कोणताही निषेध न करण्याचं ठरवलं आहे. विद्यार्थ्यांच्या नाराजीबाबत विचारलं असता प्राचार्य सेठ यांनी सांगितले की महाविद्यालयात अनेक गोष्टी आधीपासून ठरवण्यात आलेल्या आहेत. त्यात नव्या गोष्टींची भर पडायला नको म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.
विश्रामबाग पोलिसांकडे महाविद्यालयाने योग्य ती खबरदारी घ्यावी अशी विनंती केली आहे. काही माजी विद्यार्थी प्रशासनाला न जुमानता महाविद्यालयात हे दिवस साजरा करण्य़ासाठी हट्ट धरत असून त्यासाठी त्यांनी पत्रके छापली आहेत आणि व्हॉटसअप मेसेजही फिरवले असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. यातील एका विद्यार्थ्याला पोलिसांनी बोलावून हे संदेश परवणं थांबवायला सांगितले आहे.





























































