
समाजवादी पार्टीचे ज्येष्ठ नेते व खासदार आझम खान यांची प्रकृती गंभीर असल्याचे समोर आले आहे. त्यांना कोरोनाची लागण झाली असून गेल्या वीस दिवसांपासून त्यांच्यावर लखनऊच्या मेदांता रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आझम खान हे सध्या ऑक्सिजन सपोर्टवर आहेत. त्यांच्या फुफ्फुसात फायब्रॉईड व कॅविटी आढळून आली आहे.
सीतापूर तुरुंगात कैद असलेल्या आझम खान व त्यांचा मुलगा अब्दुल्ला आझम या दोघांचीही कोरोना चाचणी 1 मे रोजी पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर 9 मे रोजी आझम खान यांना मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेव्हापासून त्यांच्यावर आय़सीयूत उपचार सुरू असून त्यांना ऑक्सिजनही लावण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी त्यांच्या प्रकृतीत सुधार जाणवल्याने त्यांना जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट केले होते मात्र त्यानंतर 26 मे रोजी प्रकृती खालावल्याने त्यांना पुन्हा आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे.
आझम खान यांना 20 फेब्रुवारी 2020 ऱोजी जमिनी माफिया प्रकरणात अटक करण्यात आली होती. तेव्हापासून ते सीतापूर तुरुंगात कैद आहेत. आझम खान हे रामपूर मतदारसंघातून खासदार आहेत.




























































