
सामना प्रतिनिधी । ठाणे
अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतरची परिपूर्ण तयारी, पाठय़पुस्तक वाचून झाल्यावर आकलनासाठी व उजळणीसाठी उपयुक्त नोट्स, प्रत्येक धड्य़ाचे महत्त्वाचे मुद्दे, सूत्रे, बदललेल्या प्रश्नपत्रिकेचे स्वरूप, समुपदेशन व मार्गदर्शन असा परिपूर्ण अभ्यास व उजळणीचा अॅप रुपातला सोपा फॉर्म्युला शिवसेनेने दिव्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिला आहे.
कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील पडले, शिळ, दिवा येथील शाळांमध्ये आमदार सुभाष भोईर यांच्या वतीने दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या तयारीकरिता मोफत मोबाईल आयडिया 10 या अद्ययावत अॅपचे वाटप करण्यात आले. यावेळी दिवा हायस्कूलचे संस्थापक गोवर्धन भगत, ठाणे उपशहरप्रमुख ब्रह्माशेठ पाटील, डोंबिवली उपशहरप्रमुख अभिजित थरवळ, विभागप्रमुख अरुण म्हात्रे, उमेश भगत, युवाधिकारी सुमित भोईर, शाखाप्रमुख दिलीप पाटील, वैकुंठ म्हात्रे, श्याम काठे, सुनील अलीमकर, एसएमजी शाळेचे अध्यक्ष स्वप्नील गायकर, युवासेनेचे अभिषेक ठाकूर, आशीष शिंदे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
1124 विद्यार्थ्यांना लाभ
या उपक्रमांतर्गत पडले गावातील सरस्वती विद्यालयातील 131 विद्यार्थ्यांना अॅपचे वाटप करण्यात आले. याशिवाय शिळ गावातील हाशा रामा पाटील विद्यालयातील 148 विद्यार्थी, गणेश विद्यामंदिर, दिवा येथील 255 विद्यार्थी व इंग्रजी माध्यम 50 विद्यार्थी, एसएमजी विद्यालय दिवा 370 विद्यार्थी तसेच दिवा हायस्कूलमधील 170 विद्यार्थी अशा तब्बल 1124 दहावीच्या विद्यार्थ्यांना या आयडियल 10 मोबाईल अॅप उपलब्ध केले.
































































