नेवासा येथे लाच घेताना दोघांना रंगेहाथ पकडले

प्रातिनिधिक फोटो

नेवासा येथे सहकार खात्यातील विशेष लेखापरीक्षक आणि खाजगी लेखापरीक्षक यांना लाच घेताना रंगेहात पकडल्याने सहकार खात्यात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत समजलेली माहिती अशी की तक्रारदार हे एका पतसंस्थेचे चेअरमन असून त्यांच्या पतसंस्थेचे लेखापरीक्षण सुरू होते. तक्रारदार व त्यांचे नातेवाईक यांच्या नावावरील मुदत ठेवीच्या रकमा व्याजासह अहवालात दाखवणे, तसेच लेखापरीक्षण अहवाल चांगला सादर करणे यासाठी लेखा परीक्षक यांच्याकडून तीन लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती. तडजोडी नंतर दोन लाख रुपये देण्याचे ठरले होते.

आज नेवासा फाटा येथे बाळूमामा जूस सेंटर येथे पंचा समक्ष एक लाख रुपयांची लाच घेताना दोघांना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यावरून किसन दिगंबर सागर विशेष लेखापरीक्षक वर्ग दोन कार्यालय सहकारी संस्था अहमदनगर तसेच तय्यब वजीर पठाण खाजगी लेखा परीक्षक राहणार जळका तालुका नेवासा यांना ताब्यात घेऊन नेवासा पोलीस ठाण्यात आणले आणि तक्रार नोंदवण्यात आली आहे.

या कामी सापळा अधिकारी म्हणून हरीश खेडकर पोलीस उपाधीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभाग अहमदनगर, पोलीस अंमलदार रवींद्र निमसे, वैभव पांढरे, बाबासाहेब कराड, चालक पोलीस हवालदार हरून शेख, दशरथ लाड हे सहभागी झाले होते.