
तब्बल 3.7 कोटी रुपयांच्या सायबर घोटाळ्यातील आरोपीला विशेष सीबीआय न्यायालयाने जामीन नाकारला. हा आरोपी बारावीचा विद्यार्थी आहे. त्याचा या गुह्यात सहभाग असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.
यश ठाकूर असे या 19 वर्षीय विद्यार्थ्यांचे नाव आहे. जुलै महिन्यात नागपूरहून त्याला अटक करण्यात आली. विशेष सीबीआय न्यायाधीश बी.वाय. फड यांनी यशचा जामीन अर्ज फेटाळून लावला. हा आंतरराष्ट्रीय कट आहे. यात परदेशी पह्न नंबरचा वापर झाला आहे. अनेक बनावट खाती उघडून हा घोटाळा करण्यात आला आहे, असेही न्यायालयाने नमूद केले.
मला या प्रकरणात गोवण्यात आले आहे. मी निर्दोष आहे. माझ्याविरोधात सबळ पुरावे नाहीत. मला जामीन मंजूर करावा, अशी मागणी यशने केली होती. न्यायालयाने ती मान्य केली नाही.
काय आहे प्रकरण
या घोटाळय़ातील मुख्य आरोपी भास्कर पालांडे आहे. डिजिटल अरेस्ट, कस्टम फ्रॉड व ऑनलाईन गुंतवणुकीचे आमिष दाखवून त्याने अनेकांची फसवणूक केली. या कोटय़वधींच्या घोटाळ्यात यशने भास्करला मदत केल्याचा सीबीआयचा आरोप आहे. नवीन सीमकार्ड मिळवून देणे, घोटाळ्याचे पैसे वळते करण्यासाठी सहकार्य करण्यात यशने महत्त्वाची भूमिका बजावली आहे, असा सीबीआयचा दावा आहे.