ज्यूंचे मशीद बंदर येथील सिनेगॉग झाले 175 वर्षांचे

31

सामना प्रतिनिधी । मुंबई

मुंबापुरीत आपले हक्काचे प्रार्थनास्थळ असावे म्हणून बेणे इस्रायली ज्यू समाजाने 1843 मध्ये मशीद बंदर येथे मांडवी शारे रासोन सिनेगॉग उभारले होते. तब्बल अडीच हजार चौरस फूट जागेत उभारलेले हे दुमजली सिनेगॉग 175 वर्षांचे झाले आहे. या ऐतिहासिक वास्तूच्या पावणेदोन शतक वर्षपूर्तीनिमित्त आज रविवारी येथे ज्यू बांधव सामूहिक प्रार्थना करणार आहेत. तसेच भायखळा येथील मागन डेव्हिड सिनेगॉग येथे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या उपस्थितीत सायंकाळी 5.30 वाजता विशेष कार्यक्रम होणार आहेत.

व्यापार-व्यवसायानिमित्त मुंबापुरीत हजारो बेणे ज्यू बांधव आले. त्यांनी इस्रायल मोहल्ला टणटणपुरा स्ट्रीट मशीद बंदर येथे हे सिनेगॉगचे बांधकाम केले आहे. मुंबईतील दुसरे सर्वात जुने सिनेगॉग आहे. देशविदेशातील ज्यू बांधवही मुंबईत आल्यानंतर आवर्जून सिनेगॉगला भेट देतात असे शारे रासोन सिनेगॉगचे अध्यक्ष जुडा सॅम्युएल यांनी सांगितले. उद्या होणाऱया कार्यक्रमाला राज्यपालांसह इस्रायलचे मुंबईतील वाणिज्य दूत याकोव फिंकेलस्टाईन, धर्मगुरू (रबाय) याकोब मेनाशे, रोमिएल डॅनियल, सॉलोमन सॉफर, शारे रासोन सिनेगॉगचे व्यवस्थापिका सिनोरा कोलटकर यांच्यासह अमेरिका, इस्रायल येथून मोठय़ा संख्येने ज्यू बांधव उपस्थित राहतील असे सॅम्युएल म्हणाले.

मशीद बंदर रेल्वे स्थानकाला या सिनेगॉगमुळेच नाव मिळाले
मुंबईत रेल्वे सुरू होण्याआधी दहा वर्षांपूर्वी टणटणपुरा स्ट्रीट येथे मांडवी शारे रासोन सिनेगॉग उभारले आहे. सिनेगॉगला इस्रायली बांधव मशीद असेही म्हणतात. तसेच या सिनेगॉगमध्ये मुंबई परिसरातून मोठय़ा प्रमाणात ज्यू लोक येत. त्यामुळे या परिसराला मशीद म्हणून ओळखले जात होते. त्यावरूनच येथे उभ्या राहिलेल्या रेल्वे स्थानकाला मशीद बंदर हे नाव मिळाले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या