ईडीला कोर्टाचा झटका, अनिल देशमुखांच्या मुलांकडे पासपोर्टचा ताबा

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची मुले सलील आणि ऋषिकेश देशमुख यांना बुधवारी विशेष सत्र न्यायालयाने मोठा दिलासा दिला. कथित आर्थिक अफरातफर प्रकरणात दोघांचे पासपोर्ट ईडीच्या ताब्यात होते. ईडीने सलील व ऋषिकेश यांना त्यांचे पासपोर्ट परत द्यावेत, असे आदेश विशेष न्यायालयाने दिले. हा निर्णय ईडीसाठी मोठा झटका मानला जात आहे.

सलील आणि ऋषिकेश देशमुख यांनी जामिनाच्या आदेशातील अट शिथिल करण्याची मागणी विशेष सत्र न्यायालयाकडे केली होती. त्यांच्यातर्फे अॅड. इंद्रपाल सिंग यांनी विशेष न्यायाधीश राहुल रोकडे यांच्याकडे अर्ज केला आणि ईडीच्या ताब्यातील पासपोर्ट पुन्हा सलील आणि ऋषिकेश देशमुख यांच्याकडे परत देण्याबाबत विनंती केली. पासपोर्टसंबंधित सर्वोच्च न्यायालयाच्या विविध निकालांचा संदर्भ त्यांनी दिला. त्यावर ईडीचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर न्यायाधीश रोकडे यांनी सलील व ऋषिकेश देशमुख या दोघांकडे त्यांचे पासपोर्ट परत करण्याचे आदेश ईडीला दिले. या निर्णयाने अनिल देशमुख यांच्या दोन्ही मुलांना दिलासा मिळाला असून ईडीला झटका बसला आहे. न्यायालयाने अलीकडेच सलील देशमुख यांना पासपोर्ट नूतनीकरण करण्यास मुभा दिली होती.