
मराठी चित्रपटसृष्टीची जादू उलगडून दाखविणारा बिग एफएम वाहिनीवरील ‘बिग मराठी बायोस्कोप विथ सुबोध भावे’ हा शो जबरदस्त हिट झाला. या शोचे दुसरे पर्व आता सुरू होणार आहे.
‘बिग मराठी बायोस्कोप विथ सुबोध भावे’ हा शो संशोधनावर आधारित आहे. यामध्ये सुबोध भावे केवळ मराठी चित्रपटांच्या अज्ञात कथा सांगणारच नाही, तर या कथांबद्दलची आपली मतेही मांडतील. दुसऱ्या सीझनमध्ये सुबोध दर सोमवारी श्रोत्यांना एका प्रश्न विचारेल आणि सोबत एक अज्ञात किस्सा सांगून थक्क करेल. मराठी चित्रपटसृष्टीतील घटनांमागील सत्य, सेलिब्रिटींचे वाढदिवस आणि मराठी चित्रपटांतील महत्त्वाचे टप्पे यांना समर्पित विशेष भाग सादर होतील, जे सेलिब्रेशन आणि नॉस्टॅल्जिया यांचे मिश्रण असेल.
याविषयी सुबोध म्हणाला, ‘बिग मराठी बायोस्कोप’मुळे मला रेडिओ होस्टची भूमिका स्वीकारण्याची अनोखी संधी मिळाली. दुसऱ्या सीझनसाठी मी खूप उत्सुक आहे. या शोमुळे मला माझ्या श्रोत्यांशी अधिक वैयक्तिक पातळीवर संपर्क साधण्यास मदत होत आहे.
पुणे आणि मुंबईसोबतच नगर, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, कोल्हापूर आणि नागपूर यांसारख्या अनेक शहरांमध्ये सोमवार ते शनिवार, संध्याकाळी 7 ते 8 या वेळेत या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण होईल.



























































