कॉलेज विद्यार्थ्यांसाठी विशेष लसीकरण मोहीम राबवणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी विशेष लसीकरण मोहीम राबवणार असल्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी बुधवारी सांगितले. बुधवारपासून महाविद्यालये सुरू झाली. उदय सामंत यांनी माटुंगा येथील वीर जिजाबाई तंत्रज्ञान संस्थेत (व्हीजेटीआय) उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे स्वागत केले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवादही साधला. व्हीजेटीआयसह महाराष्ट्रातील नामवंत संस्थांचे नाव देशपातळीवर घेतले जाते याचा अभिमान असून ही गुणवत्ता परदेशातही दाखवून देऊ असे सामंत याप्रसंगी म्हणाले. व्हीजेटीआयचे संचालक डॉ. धीरेन पटेल, आयसीटीचे संचालक डॉ. अनिरुद्ध पंडित, तंत्रशिक्षण संचालक डॉ. अभय वाघ आदी याप्रसंगी उपस्थित होते. कोविडचे नियम पाळण्याबरोबरच महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांची आपल्या मुलांप्रमाणेच काळजी घ्यावी, असे आवाहनही सामंत यांनी यावेळी केले.