स्पाईस जेटच्या 700 कामगारांचा भारतीय कामगार सेनेत प्रवेश

हिंदुस्थानातील आघाडीची विमान कंपनी असलेल्या स्पाईस जेट एअरलाईन्समधील तब्बल सातशे कामगारांनी आज शिवसेना सचिव, खासदार अनिल देसाई, भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस संतोष चाळके, चिटणीस संजय कदम यांच्या उपस्थितीत भारतीय कामगार सेनेत प्रवेश केला. तसेच कंपनीतील उच्चपदस्थ अधिकाऱयांनीही ऑल इंडिया स्पाईस जेट असोसिएशनची स्थापना करून सदर संघटना भारतीय कामगार सेनेशी संलग्न केली.

स्पाईस जेटमधील कर्मचाऱयांना बारा तास डय़ुटी करावी लागत आहे. कोरोना संकटात काम करूनही पगार कमी करण्यात आले आहेत. तडकाफडकी पास काढून घेणे, कामावरून काढून टाकण्याची धमकी दिली जात आहे. या छळाला कंटाळून कामगारांनी भारतीय कामगार सेनेचे सभासदत्व स्वीकारले आहे. या वेळी स्पाईस जेटमधील कामगारांनी आपल्या कामाशी एकनिष्ठ रहावे, असे आवाहन खासदार अनिल देसाई यांनी केले. तसेच कामगारांवर अन्याय झाल्यास भारतीय कामगार सेना पूर्ण ताकदीने कामगारांच्या पाठीशी उभी राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर कामगार टिकला तर कंपनी टिकेल आणि कंपनी टिकली तरच कामगार टिकेल या शिवसेनाप्रमुखांनी दिलेल्या शिकवणुकीचीही त्यांनी कामगारांना आठवन करून दिली. याप्रसंगी चिटणीस संतोष कदम, सहचिटणीस सूर्यकांत पाटील, जगदीश निकम, राजा ठाणगे, मिलिंद तावडे, विजय शिर्के, संजू राऊत, सदस्य नीलेश ठाणगे, बाबा शिर्के, पोपट बेदरकर, ओमकार इस्वलकर, स्पाईस जेटचे सतीश बांदल, सुधीर पवार, राजेश पाटील, तुषार आडीवरेकर, मितेश भाटकर, संतोष बाटले, राजाराम गायकवाड, हरेश पवार आदी उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या