मोदी साहेबांचा प्रचार मी सांगण्याची गरज नाही. लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान त्यांनी सर्व मर्यादा ओलांडल्या आम्ही मात्र त्या पाळल्या. त्यांनी माझा भटकता आत्मा म्हणून उल्लेख केला. एका दृष्टीने बर झालं, त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आत्मा कायम राहत असतो. हा कायम राहणारा आत्मा तुम्हाला सोडणार नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते शरद पवार यांनी मोदींवर जोरदार हल्ला चढवला.
राष्ट्रवादी कॉँग्रेसचा 25 वा वर्धापन दिन सोहळा आज नगरमध्ये पार पडला. यावेळी शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींवर जोरदार टीकास्त्र सोडले. पंतप्रधानपदावरील व्यक्तीने सर्व जाती-धर्मांचा विचार केला पाहिजे. पण निवडणूक काळात भाषण करताना मोदी हे विसरले. त्यांची विचारसरणी वेगळीच होती हे सिद्ध झाले. माझ्यावर आणि शिवसेना पक्षावर जे आरोप किंवा वक्तव्ये त्यांनी केली ती त्यांना शोभणारी नव्हती, असे शरद पवार म्हणाले.
आज मोदी गॅरंटी राहिली नाही
पंतप्रधानांनी शपथ घेतली, पण लोकांनी त्यांना सहमती दिली नव्हती. देशातील जनतेने त्यांना बहुमत दिलेले नाही. तेलगू देसम आणि बिहारच्या मुख्यमंत्र्यांची त्यांनी मदत घेतली, त्यामुळे त्याठिकाणी त्यांचे राज्य झालं. आजचे जे सरकार आहे, ते मोदी सरकार नाही. निवडणुकीच्या काळामध्ये मोदी जाईल त्या ठिकाणी मोदी सरकार, मोदी गॅरंटी म्हणत होते. आज ती मोदी गॅरंटी राहिली नाही, असा टोला शरद पवार यांनी लगावला.
नकली शिवसेना म्हणणे मोदींना शोभते का?
शिवसेनेची निर्मिती बाळासाहेब ठाकरे यांनी केली आणि मराठी माणसाचा आत्मविश्वास वाढवला. त्याचा उल्लेख नकली शिवसेना असा करणे मोदींना शोभत का? शिवसेनाप्रमुखांविषयी त्यांनी जे वक्तव्य केले ते अत्यंत चुकीचे होते. मोदींना तारतम्य राहिले नाही, असे खडे बोल शरद पवार यांनी मोदींना सुनावले.
पंतप्रधान एका पक्षाचा नसतो, देशाचा असतो. पंतप्रधान पदावरील व्यक्तीने सर्व जाती, धर्म, भाषा आणि प्रांताचा विचार करायचा असतो. पण मोदींना त्याचा विसर पडला.