
शिरीष कणेकर
क्रिकेट निवड समितीचा सदस्य होणे हा ‘थँकलेस जॉब’ आहे. अमक्याला घेतलं तर का घेतलं व तमक्याला काढलं तर का काढलं, हे प्रश्न क्रिकेटप्रेमींकडून कायम त्यांच्या तेंडावर फेकून मारले जातात. ते कोणाकोणाला कशाकशाचं उत्तर देतील? (ते कशाचंच कोणाला उत्तर देत नाहीत हा भाग वेगळा) झालंय काय, पूर्वी निवड समितीचे सदस्य जाणकार समजले जात. आता सर्वसामान्य क्रिकेटप्रेमीही जाणकार असतो. वाचून, पाहून, ऐकून त्याला बरंच काही कळत असतं. पहिल्या दोन षटकांत धो-धो मार खाणारा भुवनेश्वर कुमार शेवटच्या मारझोडीच्या षटकांसाठी राखून ठेवणं कितपत शहाणपणाचं आहे, हा प्रश्न त्यालाही पडतो. तोंडाशी आलेल्या विश्वचषकात हेच आपले आत्मघातकी धोरण असणार आहे का, हा सवाल त्याला त्रस्त करतो. तुम्ही बाता मारता, प्रशिक्षक द्रविड सामना जिंकल्यावरही अंत्ययात्रेला आल्यासारखा सुतकी चेहऱयानं बसून राहतो. प्रयोग-प्रयोग म्हणता ते केव्हा व कोणाला घेऊन करणार आहात?
इंग्लंडविरुद्ध उमेश यादवला खेळवण्यात कसला (जादूचा) प्रयोग होता? ज्याचा विश्वचषक संघातच समावेश नाही त्याला खेळवून तुम्ही काय साधता? उमेश यादवला खेळवता तर अनाकलनीय कारणानं खडय़ासारख्या वगळलेल्या (व नंतर राखीव म्हणून निवडलेल्या) शमीला का नाही खेळवून पाहण्यात आलं? वास्तविक पाहायचंय काय, शमी हा बुमराहखालोखाल देशातील सर्वात चांगला वेगवान आहे हे नव्यानं सिद्ध होईल अशी निवड समितीला भीती वाटते की काय? ऑस्ट्रेलियातील वेगवान व उसळत्या खेळपट्टय़ांवर शमी घातक ठरेल हे काय एकटय़ा शमीलाच वाटतं? कर्णधार रोहित शर्मा व प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी शमीच्या नावाचा आग्रह का धरला नाही? त्यांना हर्षल पटेल शमीपेक्षा सरस वाटतो? पटेलला मत ऑस्ट्रेलियाचा तडाखेबंद यष्टिरक्षक-फलंदाज मॅथ्यू वेड यानं तर दिलं नसेल?
भुवनेश्वर कुमार व हर्षल पटेल या ‘फ्लॉप’ वेगवान गोलंदाजांना (कोणाला वेग आहे?) कर्णधार रोहितनं पाठीशी घातलंय. वाईट काळात संघातील अपयशी खेळाडूंच्या पाठीशी उभं राहणं हा कर्णधाराचा चांगला गुण मानला जातो (तो विराट कोहलीच्याही पाठीशी असाच ठामपणे उभा राहिला होता. कोहलीनं त्याचा विश्वास सार्थ ठरविला) परंतु भुवनेश्वर कुमार व हर्षल पटेलवर रोहितनं दाखवलेला विश्वास अनाठायी तर ठरणार नाही ना? त्यांची कामगिरी सुमार होतेय हे त्यांचा फॉर्म तूर्तास गेल्याचे लक्षण आहे की एकूणच कारकीर्द संपल्याचे द्योतक आहे, हे थेट विश्वचषकातच कळणार. यात तुम्हाला जोखीम नाही वाटत? चहर, सिराज, प्रसिध कृष्णा प्रभृतींना खेळवून पाहायला नको होतं का? रवी बिष्णोई सोडून एकही फिरकी गोलंदाज क्षितिजावर दिसू नये? आपल्या देशात फिरकीपटूंचं हे दुर्भिक्ष? शम्स मुलानीचा विचारही का होत नाही? सामन्यांमागून सामन्यात विकेट्स काढून तो असा उपेक्षित का?
निवड समितीचे तीन सर्वेसर्वा सदस्य आहेत – चेतन शर्मा (अध्यक्ष), ऍबी कुरुविला व देवाशीष मोहंती. तिघंही वेगवान गोलंदाज? एकाही फलंदाजाची किंवा गोलंदाजाची वर्णी लागू शकली नाही? शेवटचा चेंडू फुलटॉस टाकून सामना कसा गमवायचा हे तर चेतन शर्मा हर्षल पटेलला शिकवण्याचा प्रयत्न करत नसेल?
विराट कोहलीला रोहितबरोबर सलामीला पाठवावे काय? राहुलला मधल्या फळीत खेळवावं की खेळवूच नये? शुभमन गिलची वर्णी संघात का लागू नये? ऋषभ पंत खेळणाऱया संघात नसेल तर त्याच्या जागी त्या क्रमांकावर हुडाला खेळवणार की कार्तिकला? अक्षर पटेल आपलं संघातील स्थान बळकट करतोय. जाडेजा ‘बॅटिंग ऑलराऊंडर’ होता तर अक्षर ‘बोलिंग ऑलराऊंडर’ आहे. आपल्याला त्याची जास्त गरज आहे. अश्विन आजही देशातला सर्वोत्कृष्ट फिरकी गोलंदाज समजला जातो, परंतु तो बहुधा संघाबरोबर फिरणारा प्रवासी सहकारी असतो. एकदा त्याची संघातील पोझीशन स्पष्ट करण्यात यावी.
पूर्वीच्या तुलनेत आपला क्षेत्ररक्षणाचा दर्जा खूपच सुधारलाय. (तसा तो सगळय़ांचाच सुधारलाय) पूर्वीचे अनेक मान्यवर खेळाडू क्षेत्ररक्षणात अगदीच थिटे पडल्याने आजच्या संघात येऊ शकणार नाहीत. उदा. संदीप पाटील. 1960-61 साली मी महान लेगस्पिनर सुभाष गुप्तेला ब्रेबॉर्न स्टेडियमवर क्षेत्ररक्षण करताना पाहिले होते. तो चेंडूच्या मागे धावताना सीमारेषेकडे वेगाने निघालेल्या चेंडूला शेवटपर्यंत सोबत करणे हा त्याचा धावण्यामागचा उद्देश वाटायचा. त्याला प्रेक्षक हसायचेच, पण तो स्वतःही हसत असायचा.
आज फलंदाजीपेक्षा गोलंदाजीत आपला संघ कमजोर वाटतो. प्रत्यक्षात काय होतंय बघू या. घोडा मैदान जवळच आहे.

























































