मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धा , सिंधू, प्रणॉय उपांत्यपूर्व फेरीत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

स्टार खेळाडू पी. व्ही. सिंधू आणि थॉमस चषक स्पर्धेतील विजेता एच. एस. प्रणॉय या हिंदुस्थानी खेळाडूंनी आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करत मलेशिया मास्टर वर्ल्ड सुपर सीरिज स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक दिली. मात्र दुसरीकडे साई प्रणीत व पी. कश्यप यांचे आव्हान दुसऱ्या फेरीत संपुष्टात आले.

सातव्या मानांकित पी. व्ही. सिंधूने दुसऱया फेरीत 28 वे मानांकन असलेल्या चीनच्या जिंग यी मन हिचा 21-12, 21-10 असा सरळ गेममध्ये धुव्वा उडवत आगेकूच केली. 27 वर्षीय सिंधूने ही एकतर्फी लढत केवळ 28 मिनिटांत जिंकली. मात्र आता सिंधूपुढे द्वितीय मानांकित चिनी तैपेईच्या ताई त्जु यिंग हिचे आव्हान असेल. पुरुष एकेरीत हिंदुस्थानच्या एच. एस. प्रणॉयने चिनी तैपेईच्या वांग त्जु वेई याचा चुरशीच्या लढतीत 16-21, 21-18, 27-25 असा पराभव करून अंतिम आठमध्ये धडक दिली. प्रणॉयने पहिला गेम गमावल्यानंतर ज्या पद्धतीने लढतीत पुनरागमन केले ते नक्कीच कौतुकास्पद होते. प्रणॉयची गाठ आता जपानच्या कैंता सुनायामा याच्याशी पडणार आहे.